अनंतनागच्या बिजबेहरामध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, 6 नागरिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 15:12 IST2018-05-23T15:12:26+5:302018-05-23T15:12:26+5:30
दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात बिजबेहरामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांच्या या ग्रेनेड हल्ल्यात 6 स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत.

अनंतनागच्या बिजबेहरामध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, 6 नागरिक जखमी
जम्मू-काश्मीर- दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात बिजबेहरामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांच्या या ग्रेनेड हल्ल्यात 6 स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांच्या गाडीला यावेळी लक्ष्य केलं आहे. परंतु त्यांचा निशाणा चुकला आणि ग्रेनेडचा रस्त्यावर पडून स्फोट झाला. या हल्ल्यात 6 लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुरक्षा जवानांनी पूर्ण परिसराला घेराव घातला असून, दहशतवाद्यांची धरपकड सुरू केली आहे.
जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तान गेल्या 6 दिवसांपासून लागोपाठ शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवानही शहीद झाले आहेत. अरनिया आणि सांबा सेक्टरनंतर पाकिस्तानी रेंजर्सचा आरएसपुरामध्येही गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात सकाळपासून आतापर्यंत 4 नागरिकांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी कथुआ जिल्ह्यातल्या हिरानगर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. याच गोळीबारात राम पॉल नावाच्या नागरिकाचा मृत्यू झाला.
पाकिस्ताननं आतापर्यंत बीएसएफच्या जवळपास 40 चौक्यांना लक्ष्य केलं आहे. काल रात्रीपासून पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचाही मारा करण्यात येतोय. मृत नागरिकांमध्ये तीन जण हिरानगर सेक्टरमधल्या लोदी गावातले असून, एक जण अरनिया सेक्टरमधला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून रात्री उशिरापर्यंत हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता.