"न्यूटनने नंतर सांगितले, वैदिक ग्रंथांमध्ये आधीपासून उल्लेख"; गुरुत्वाकर्षणाबाबत हरिभाऊ बागडेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 10:27 IST2025-03-06T10:19:18+5:302025-03-06T10:27:20+5:30
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी गुरुत्वाकर्षणाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

"न्यूटनने नंतर सांगितले, वैदिक ग्रंथांमध्ये आधीपासून उल्लेख"; गुरुत्वाकर्षणाबाबत हरिभाऊ बागडेंचा दावा
Rajasthan Governor Haribhau Bagde: माजी सभापती आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झालीय. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणाऱ्या आयझॅक न्यूटनबाबत राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मोठं विधान केलं आहे. न्यूटनच्याही आधी गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख वैदिक ग्रंथांमध्ये असल्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं. खूप आधीपासूनच वैदिक ग्रंथांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत उल्लेख असल्याचा दावा हरिभाऊ बागडे यांनी केला. त्यामुळे आता हरिभाऊ बागडे यांनी केलेल्या विधानावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या जयपूर प्रादेशिक केंद्रात आयोजित दीक्षांत समारंभात हरिभाऊ बागडे बोलत होते. भारत हे प्राचीन काळापासून ज्ञान आणि विज्ञानाचे केंद्र आहे. भारतातील नालंदा विद्यापीठासारख्या प्रसिद्ध संस्थेने जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित केल्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं.
"न्यूटनने गुरुत्वाकर्षणाबद्दल खूप नंतर सांगितले. भारतात याचा उल्लेख वैदिक ग्रंथांमध्ये फार पूर्वीपासून आहे. भारताचे प्राचीन ज्ञान पुसून टाकण्याचे सतत प्रयत्न केले जात होते. ११९० च्या दशकात नालंदा ग्रंथालय जाळण्यात आलं होतं. इंग्रज आल्यानंतर त्यांनी भारतीय ज्ञान दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवणे आणि त्यांना भारतीय ज्ञान आणि विज्ञानाशी जोडणे आवश्यक आहे," असं हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं.
"भारत देश हा प्राचीन काळापासून ज्ञान आणि विज्ञानाने समृद्ध आहे. भारतात नालंदासारखे मोठे विद्यापीठ होते. दूरदूरचे विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत असत. भारतीय ज्ञान नष्ट करण्याचे सतत प्रयत्न होत होते पण ते यशस्वी झाले नाहीत. प्राचीन काळापासून भारत ज्ञान परंपरेत श्रेष्ठ आहे. भारताने जगाला दशांश प्रणाली दिली," असंही हरिभाऊ बागडे म्हणाले.
राजस्थान ही योद्ध्यांची भूमी असल्याचे सांगत बाप्पा रावल यांनी शंभर वर्षे परकीय आक्रमकांना येथे येऊ दिले नाही, असंही हरिभाऊ बागडेंनी म्हटलं. शिकण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. विद्यार्थ्यांनीही त्यांची बौद्धिक क्षमता वाढवणारी आणि जीवनात यशस्वी होण्यास मदत करणारी पुस्तके वाचली पाहिजेत. रोजगार मिळवण्याची मानसिकता न ठेवता रोजगार देणारे बनण्याची मानसिकता ठेवायला हवी, असं हरिभाऊंनी म्हटलं. यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी व पदके प्रदान करण्यात आली.