बिहारच्या चंडी परिसरातून एक अनोखी लव्हस्टोरी समोर आली आहे. ग्रॅज्युएट झालेल्या तरुणीने समाजाची पर्वा न करता पाचवी शिकलेल्या आपल्या बॉयफ्रेंडची जोडीदार म्हणून निवड केली. कुटुंबाची स्वप्नं, समाजाची बंधनं आणि भविष्याची चिंता बाजूला सारून ही तरुणी मुंबईहून बिहारच्या एका छोट्याशा गावात एकटीच पोहोचली. तीन दिवसांचा रेल्वे प्रवास, मोबाईल लोकेशनच्या मदतीने बॉयफ्रेंडचं घर शोधलं आणि मंदिरात जाऊन लग्न केलं.
मुंबईहून बिहारच्या चंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोसिमपूर गावात पोहोचलेल्या सपना कुमारीने तिचा बॉयफ्रेंड मनीष कुमार याच्याशी मंदिरात लग्न केलं. सपना ही उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी रंजय यादव यांची मुलगी आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी ती घरातून बाहेर पडली होती आणि बॉयफ्रेंडकडे पोहोचल्यानंतर दोघे पती-पत्नीसारखे राहत होते. याच दरम्यान मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, ज्याच्या आधारे सोमवारी चंडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं.
मुंबईत जुळलं सूत
मनीषचं शिक्षण केवळ पाचवीपर्यंत झालं असून तो मुंबईत मजुरी करायचा. तर सपना ग्रॅज्युएट असून ती मुलांना शिकवण्याचं काम करायची. मुंबईत दोघांच्या खोल्या जवळजवळ होत्या आणि याच काळात त्यांच्यात जवळीक वाढली. केवळ तीन महिन्यांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. दोन महिन्यांपूर्वी मनीष अचानक गावी परतला, तरीही सपनाचा त्याच्याशी फोनवरून संपर्क सुरू होता.
१५ दिवसांपूर्वी एकटीच मुंबईहून निघाली
सपनाच्या घरच्यांना या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली आणि त्यांनी सपनाचं लग्न दुसरीकडे ठरवलं. कुटुंबाच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या तरुणीने बॉयफ्रेंडशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, पण कुटुंबीय तयार झाले नाहीत. अखेर १५ दिवसांपूर्वी ती एकटीच मुंबईहून निघाली. तीन दिवसांच्या प्रवासानंतर आणि मनीषने पाठवलेल्या मोबाईल लोकेशनच्या आधारे ती थेट मोसिमपूर गावात पोहोचली. तिथे दोघांनी जगदंबा मंदिरात लग्न केलं.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
पालकांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये सपना मनीषसोबतच्या लग्नाचं फुटेज दाखवताना म्हणते की, "मी माझ्या मर्जीने लग्न केलं आहे. माझ्या घरचे बळजबरीने माझं लग्न दुसरीकडे लावून देत होते, पण मला तो मुलगा पसंत नव्हता. मी माझ्या बॉयफ्रेंडवर प्रेम करते, म्हणून मुंबईहून पळून त्याच्याकडे आले आहे."