"सरकारने चर्चेच्या दिवसाची वाट पाहिली, दहशतवाद्यांना आधीच मारता आले असतं"; सपा खासदाराचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:49 IST2025-07-28T18:46:44+5:302025-07-28T18:49:11+5:30
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार केल्याच्या वृत्तावरुन समाजवादी पक्षाच्या खासदाराने सरकारला सवाल विचारला आहे.

"सरकारने चर्चेच्या दिवसाची वाट पाहिली, दहशतवाद्यांना आधीच मारता आले असतं"; सपा खासदाराचा मोठा दावा
Ramashankar Rajbhar on Operation Sindoor: ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सैन्याने सोमवारी श्रीनगरच्या लिडवास भागात लपलेल्या ३ दहशतवाद्यांना ठार केले. ऑपरेशन महादेवमध्ये संयुक्त कारवाईत एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी मुसा याला भारतीय सैन्याने संयुक्त कारवाईत ठार मारले आहे. दुसरीकडे संसदेतही पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला आज सुरुवात झाली. मात्र ही चर्चा सुरु होण्याच्या दिवशीच या दहशतावाद्यांचा खात्मा करण्यात आल्याने समाजवादी पक्षाच्या खासदाराने शंका उपस्थित केली आहे.
सोमवारी लोकसभेत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, सपा खासदार रामशंकर राजभर यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशाला ऑपरेशन सिंदूरची नाही तर 'ऑपरेशन तंदूर'ची आवश्यकता होती. या अंतर्गत दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देऊन तंदूरमध्ये टाकले गेले असते, असं विधान रामशंकर राजभर यांनी केलं. पहलगाम हल्ल्यानंतर देशात प्रचंड संताप होता आणि जनतेला तीन दिवसांत दहशतवाद्यांवर कठोर कारवाई हवी होती. पण सरकारने १७ दिवसांनंतर कारवाई सुरू केली, असंही राजभर म्हणाले. तसेच पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी मारल्या गेलेल्या १०० दहशतवाद्यांमध्ये होते का? असाही सवाल राजभर यांनी केला.
"पहलगाम हल्ला हा भारतात दंगली पसरवण्याचा कट होता. पण हिंदू-मुस्लिमांमध्ये असलेल्या ऐक्याने शत्रूचा प्रत्येक कट हाणून पाडला. एकता भारताची सर्वात मोठी ताकद आहे आणि जातीय सलोखाच देशाला मजबूत ठेवू शकतो," असं सपा खासदाराने म्हटलं. तसेच "ट्रम्प यांनी सार्वजनिक व्यासपीठांवर २६ वेळा दावा केला की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणण्यात अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमेरिकेने शस्त्रास्त्र विक्री केल्यामुळे दक्षिण आशियातील तणाव कमी झाला आहे असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. जर ट्रम्प यांचा दावा बरोबर असेल तर भारताची भूमिका काय होती?," असं रामशंकर राजभर म्हणाले.
दरम्यान, संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना राजभर यांनी लष्कराच्या कारवाईवरुन भाष्य केलं. "आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली, म्हणूनच पहलगामचे दहशतवादी मारले गेले. जर ही चर्चा आधी झाली असती तर हे दहशतवादी आधीच मारले गेले असते. सरकार खूप हुशारीने काम करते. असे दिसते की सरकार चर्चेच्या दिवसाची वाट पाहत होते. संरक्षणमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की आम्ही १०० दहशतवाद्यांना ठार मारले आहे आणि त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पण या देशाला हे जाणून घ्यायचे होते की ते चार दहशतवादी मारले गेले की नाही. सरकार खूप हुशार आहे. जर आज दहशतवादी मारले गेले असतील तर संरक्षणमंत्र्यांनी तसे सांगायला हवे होते, पण त्यांनी हे घडल्याचे सभागृहाला सांगितले नाही," असेही रामशंकर राजभर यांनी म्हटलं.