शेतकऱ्यांपुढे सरकार नरमले, कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव, प्रजासत्ताकदिनी रॅली न काढण्याची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 06:59 IST2021-01-21T00:37:49+5:302021-01-21T06:59:18+5:30
मंत्रीगट व शेतकरी नेत्यांमध्ये दहावी बैठक पार पडली. आजच्या चर्चेत सरकार एक पाऊल मागे घेताना दिसले. दोन वर्षांसाठी कायदे स्थगित करू व शेतकऱ्यांची एक समिती तयार करू, असा प्रस्ताव शेतकऱ्यांपुढे ठेवला. शेतकऱ्यांनी घोषित केल्याप्रमाणे २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढली जाणार आहे.

शेतकऱ्यांपुढे सरकार नरमले, कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव, प्रजासत्ताकदिनी रॅली न काढण्याची विनंती
विकास झाडे -
नवी दिल्ली :शेतकरी आणि मंत्रीगटाच्या बैठकीत सरकारवर कायद्यापेक्षा शेतकऱ्यांच्या रॅलीचे दडपण दिसून आले. मंत्र्यांनी रॅली काढू नका, अशी विनंती केली शिवाय दोन वर्षांसाठी कृषी कायदे स्थगित करू आणि शेतकऱ्यांची समिती तयार करू, असा प्रस्ताव शेतकरी नेत्यांना देण्यात आला आहे. शेतकरी यावर उद्या गुरुवारी उत्तर देणार आहेत.
मंत्रीगट व शेतकरी नेत्यांमध्ये दहावी बैठक पार पडली. आजच्या चर्चेत सरकार एक पाऊल मागे घेताना दिसले. दोन वर्षांसाठी कायदे स्थगित करू व शेतकऱ्यांची एक समिती तयार करू, असा प्रस्ताव शेतकऱ्यांपुढे ठेवला. शेतकऱ्यांनी घोषित केल्याप्रमाणे २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढली जाणार आहे. परंतु अशी कुठलीही रॅली काढू नका, अशी विनंती आजच्या बैठकीत कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केली.
समितीवरील टीका अनाठायी; सुप्रीम काेर्टाने व्यक्त केली नाराजी -
नव्या कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांची बाजू ऐकण्यासाठी न्यायालयाने नेमलेल्या चार सदस्यांच्या समितीला कोणतेही न्यायिक अधिकार प्रदान केलेले नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यामुळे या समितीवर होणारी टीका अयोग्य आहे असेही काेर्टाने सुनावले.
या समितीतील एक सदस्य भूपिंदरसिंग मान यांनी राजीनामा दिल्याने त्यांची जागा भरण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका भारतीय किसान पार्टीने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली.
‘एनआयए लक्ष्य करीत आहे’ -
प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढू नये यासाठी सुप्रीम कोर्टात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनीच निर्णय घ्यावा, असे कोर्टाने सांगितले. तर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) शेतकऱ्यांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप बैठकीत शेतकऱ्यांनी केला.
सुरक्षा व्यवस्थेत वाढ! -
- प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी राजपथावर घुसण्याचा प्रयत्न करू नये म्हणून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. शिवाय कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून पंतप्रधान व गृहमंत्री आदींच्या निवासस्थानांची सुरक्षा कडक करण्यात आली आहे.
- २६ जानेवारी रोजी तिकीट खरेदी करून वा पास घेऊन शेतकरी संचलनात अडथळा आणू शकणार नाहीत. अशा शेतकऱ्यांना पकडण्यासाठी दिल्ली पोलीस सामान्य लोकांमध्ये तैनात असतील.
- रॅलीसाठी दिल्लीत वेगवेगळ्या सीमेवर शेतकऱ्यांची जय्यत तयारी सुरू आहे. आज टिकरी सीमेवर एका शेतकऱ्याच्या हृदयविकाराने मृत्यू झाला.