दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:05 IST2025-12-17T12:04:18+5:302025-12-17T12:05:13+5:30
दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी आस्थापने, कंपन्यांना १८ डिसेंबरपासून जास्तीत जास्त ५० टक्क्यांपर्यंत कामगारांना वर्क फ्रॉम होम देण्याचे निर्देश दिले आहेत

दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत वाढत्या प्रदूषणाचे भीषण संकट लक्षात घेता राज्य सरकारने मोठी पाऊले उचलली आहेत. दिल्लीत यापुढे बीएस VI पेक्षा कमी स्टँडर्डच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयात ५० टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम बंधनकारक करण्यात आले आहे. सोबतच राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रात काम ठप्प झाल्याने परिणाम झालेल्या सर्व मजुरांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत १६ दिवसांसाठी बांधकामे थांबवण्यात आली आहेत. अनेक कामे ठप्प झाल्याने मजुरांवर संकट ओढावले आहे. त्यामुळे सर्व नोंदणीकृत मजुरांच्या खात्यावर १० हजार पाठवण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला आहे.
त्याशिवाय दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी आस्थापने, कंपन्यांना १८ डिसेंबरपासून जास्तीत जास्त ५० टक्क्यांपर्यंत कामगारांना वर्क फ्रॉम होम देण्याचे निर्देश दिले आहेत. या नियमातून काही क्षेत्रांना वगळण्यात आले आहे. ज्यात हॉस्पिटल, अग्निशमक दल, जेल प्रशासन, सार्वजनिक परिवहन, इलेक्ट्रिसिटी, पाणी विभाग, आपत्कालीन विभाग, महापालिका सेवा यासारख्या विभागांचा समावेश आहे. सोबतच दिल्लीत कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात यावा असं आवाहन दिल्ली सरकारकडून कंपन्यांना करण्यात येत आहे.
सर्व कर्मचाऱ्यांना एकाच वेळी बोलावून एकाच वेळी घरी पाठवणे आवश्यक नाही. कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करा. काही कर्मचाऱ्यांना १० वाजता बोलवा तर काहींना १२ वाजता बोलवा. कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या टायमिंगला बोलवत जा. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना कार पूलिंगचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करा अशी सूचना केंद्रीय मंत्री कपिल मिश्रा यांनी केली आहे.
दिल्ली प्रचंड हवा प्रदूषण
दिल्लीत एअर क्वालिटी इंडेक्स बुधवारी ३२९ वर अत्यंत खराब कॅटेगिरीत समाविष्ट झाली आहे. मागील ३ दिवसांपासून राजधानीत गंभीर हवा प्रदूषणातून काहीसा दिलासा मिळाला. काही परिसर आजही प्रदूषित आहेत. दाट धुक्यामुळे विमान आणि वाहतूक सेवा कोलमडली आहे. याठिकाणी रस्ते अपघातात हे प्रमुख कारण बनत आहे. वाढत्या हवा प्रदूषणामुळे दिल्ली सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत.