Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 10:07 IST2025-11-17T10:06:29+5:302025-11-17T10:07:51+5:30
Chandrayaan 4 Mission: 'चांद्रयान-४' मोहीम अमलात आणण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून आखलेल्या व प्रत्यक्षात अमलात आणलेल्या अंतराळ मोहिमांमुळे जगावर छाप सोडल्यानंतर आता यंदा वर्षभरात सात प्रक्षेपण मोहिमांचे नियोजन भारतीय अवकाश संशोधन संस्थेने केले असून २०२८ पर्यंत 'चांद्रयान-४' मोहीम अमलात आणण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
काय आहे चांद्रयान-४ मोहीम
या मोहिमेत चंद्रावरून काही नमुने परत पृथ्वीवर आणण्याची योजना असून ही अत्यंत क्लिष्ट अशी मोहीम आहे. २०२८ पर्यंत चांद्रयान-४ प्रक्षेपित करण्याचे इसोचे नियोजन आहे. २०३५ पर्यंत भारताचे अंतराळ स्थानक उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजनेवरही काम सुरू आहे.
सात प्रक्षेपणांची तयारी
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारतीय तंत्रज्ञान व उद्योग क्षमतेचा विस्तार वेगाने होत असून इस्रो यात सात प्रक्षेपणांची तयारी करीत आहे. यात एक व्यावसायिक संवाद उपग्रह व इतर पीएसएलव्ही तसेच जीएसएलव्हीच्या प्रक्षेपणांचा समावेश आहे.
२०३५ पर्यंत स्वतःचे स्पेस सेंटर
नारायणन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०३५ पर्यंत भारताचे अंतराळ स्थानक उभारण्याच्या दिशेने काम सुरू असून यातील पहिले २०२८ मध्ये पृथ्वीकक्षेत स्थापित केले जाईल. सध्या अमेरिका, चीन, रशिया यांची अंतराळ स्थानके असून या रांगेत भारत असेल.