गुगल भारतात मोठी गुंतवणूक करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् सुंदर पिचाई यांची फ्रान्समध्ये भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:08 IST2025-02-12T09:06:40+5:302025-02-12T09:08:01+5:30
फ्रान्समध्ये झालेल्या एआय अॅक्शन समिटच्या पार्श्वभूमीवर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

गुगल भारतात मोठी गुंतवणूक करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् सुंदर पिचाई यांची फ्रान्समध्ये भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदी एआय समिटला उपस्थित राहिले, या ठिकाणी विविध देशांचे प्रमुख नेते देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यात एक बैठक झाली आहे.
EVM डेटा नष्ट करू नका; पडताळणी याचिकांवर सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश
पॅरिसमध्ये झालेल्या एआय अॅक्शन समिटच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतल्यानंतर सुंदर पिचाई म्हणाले, 'एआयने भारतासाठी अविश्वसनीय संधी आणल्या आहेत. 'देशाच्या डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी गुगल आणि भारत यांच्यातील सखोल सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदींसोबत चर्चा झाली', असंही त्यांनी सांगितले.
यावेळी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, "आज पॅरिसमध्ये एआय अॅक्शन समिट दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आनंद झाला. आम्ही एआय भारतात आणणाऱ्या अविश्वसनीय संधी आणि भारताच्या डिजिटल परिवर्तनावर आपण एकत्र काम करू शकतो अशा मार्गांवर चर्चा केली"
एआय अॅक्शन समिटच्या आधी, पंतप्रधान मोदींनी पॅरिसमधील भारत-फ्रान्स सीईओ फोरमला संबोधित करताना म्हणाले होते की, हे व्यासपीठ आर्थिक संबंध मजबूत करण्यात आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
"भारत आणि फ्रान्समधील व्यावसायिक, नेते प्रमुख क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण करण्यासाठी एकत्र येत आहेत, यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी विकास आणि गुंतवणूक वाढेल असा विश्वास सुंदर पिचाई यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा फक्त एका व्यावसायिक कार्यक्रमापेक्षा जास्त आहे, हे भारत आणि फ्रान्समधील प्रतिभाशाली विचारांचा संगम आहे. तुम्ही नवोपक्रम, सहकार्य आणि पुनरुज्जीवनाचा मंत्र स्वीकारत आहात, प्रगती करत आहात. बोर्डरूम कनेक्शन निर्माण करण्यापलीकडे, तुम्ही भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारी सक्रियपणे मजबूत करत आहात, असंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "भारत आणि फ्रान्स फक्त लोकशाही मूल्यांनी जोडलेले नाहीत. खोल विश्वास, नाविन्य आणि लोकांची सेवा हे आमच्या मैत्रीचे आधारस्तंभ आहेत. आमचे संबंध फक्त आमच्या दोन्ही देशांपुरते मर्यादित नाहीत. एकत्रितपणे, आम्ही जागतिक समस्यांवर उपाय प्रदान करत आहोत.