Gone are the days of expansionism, this is the time of evolution! Modi attack on China from Leh | विस्तारवादाचा गेला काळ, ही विकासवादाची वेळ! मोदींचा लेहमधून चीनला टोला

विस्तारवादाचा गेला काळ, ही विकासवादाची वेळ! मोदींचा लेहमधून चीनला टोला

लेह (लडाख) - लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अचानक लेहचा दौरा केला. मोदींच्या या दौऱ्यामुळे चीनसह अनेकांच्या भुवया उंचवल्या गेल्या आहेत. दरम्यान, लडाखमधून लष्करातील जवानांशी संवाद साधताना मोदींनी चीनलाही थेट इशारा दिला. विस्तारवादी धोरण राबवण्याचा काळ आता गेला आहे. आता विकासवादाची वेळ आहे, असा टोला मोदींनी चीनला लगावला.

आज सकाळी पंतप्रधान मोदी धक्कातंत्राचा वापर करत थेट लेहमध्ये दाखल झाले. या भेटीवेळी मोदींनी लष्कर आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच गलवानमधील चकमकीत जखमी झालेल्या जवानांचीही मोदींनी भेट घेतली. त्यानंतर मोदींनी लेहमध्ये जवानांना संबोधित केले.

त्यावेळी मोदींनी भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक करतानाच चीनच्या विस्तारवादी धोरणावर टीका केली, ते म्हणाले की, विस्तारवादाचा काळ आता संपुष्टात आला आहे. आजची वेळ ही विकासवादाची आहे. वेगाने बदलत असलेल्या काळात विकासवादच प्रासंगिक आहे. विकासवादासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत आणि त्याच विकासाचा आधार आहे. गेल्या शतकात विस्तारवादानेच मानवजातीचा विशान केला होता. त्यामुळे कुणीही विस्तारवादासाठी घेतलेली भूमिका ही जागतिक शांतीसाठी धोका ठरू शकते. अशा विस्तारवादी शक्ती संपुष्टात येतात, याला इतिहास साक्षीदार आहे, असा गर्भित इशाराही मोदींनी दिला.

यावेळी मोदींनी भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण देत चीनला इशारा दिला. आम्ही बासरी वाजवणाऱ्या कृष्णाची पूजा करतो आणि सुदर्शन चक्र धारण केलेल्या श्रीकृष्णालाही पूजतो, असे मोदी म्हणाले. भारताच्या लडाख आणि अरुणाचल प्रदेशमधील मोठ्य भूभागावर चीन दावा करत असतो. तसेच भारताशिवाय रशिया, भूतान, व्हिएतनाम आदी अनेक देशांच्या भूभागावर चीनकडून दावेदारी सांगण्यात येत असते.  

दरम्यान, आजच्या संबोधनावेळी मोदींनी गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याचेही कौतुक केले. ते म्हणाले की, देशवासियांना जवानांच्या पराक्रमाचा अभिमान आहे. आज मी माझ्या वाणीतून आपला जयघोष करतोय, गलवान घाटीत शहीद झालेल्या देशातील जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून भारतीय जवान आपलं शौर्य दाखवत आहेत. आज प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगली आहे, देशवासियांनी आपल्यासमोर नतमस्तक केलंय. गलवान खोऱ्यातील नदी, पर्वत, खोऱ्यातील कानाकोपरा देशातील जवानांच्या पराक्रमाची गाथा गात आहे. देशातील 130 कोटी भारतीयांच्या सन्मानाचा हा पराक्रम आहे, देशासाठी बलिदान देणाऱ्या राष्ट्रभक्तांची ही भूमी आहे. आपण त्याच भारतमातेचे वीर आहात, ज्या भारतमातेने आजपर्यंत हजारो आक्रमकांना चोख प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्र आणि मानवतेच्या प्रगतीसाठी शांतीप्रिय असणे गरजेचं असतं. भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण कुणी आम्हाला डिवचलं तर, उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत, असे म्हणत थेट सीमारेषेवरुनच मोदींनी चीनला स्पष्ट संदेश दिला आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gone are the days of expansionism, this is the time of evolution! Modi attack on China from Leh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.