उत्तर प्रदेशच्या गोंडा येथील भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमर किशोर कश्यप उर्फ बंबम हे एका महिलेसोबतच्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहेत, ज्यामध्ये ते भाजपा कार्यालयात एका महिला कार्यकर्त्याला मिठी मारताना दिसत आहेत. या व्हिडिओवर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच हा आमच्याच कार्यालयातील व्हिडीओ असून मी फक्त महिलेला आधार दिला असं म्हटलं आहे.
अमर किशोर कश्यप म्हणाले की, या महिला भाजपाच्या कार्यकर्त्या आणि एक्टिव्ह सदस्य आहेत. तब्येत ठीक नसल्याने त्यांनी मला फोन करून काही तास विश्रांती घेण्याबाबत सांगितलं. मी त्यांना माझ्या गाडीतून ऑफिसमध्ये बोलावलं. त्या पायऱ्या चढत असताना त्यांना चक्कर येत होती आणि त्या पडू नयेत म्हणून मी त्यांना फक्त आधार दिला. त्यांनी माझा हात धरला. जर एखाद्याला मदत करणं गुन्हा असेल तर मी काहीही बोलू इच्छित नाही.
भाजप जिल्हाध्यक्ष अमर किशोर कश्यप उर्फ बंबम यांनी हा व्हिडिओ त्यांच्या कार्यालयाच्या परिसरातील आहे आणि १२ एप्रिल रोजी रेकॉर्ड करण्यात आला आहे असं म्हटलं आहे. आता महिलेची प्रकृती ठीक असून त्या विश्रांती घेत आहेत. हा व्हिडीओ आपल्याच काही लोकांद्वारे व्हायरल झाला आणि त्यांनी त्याच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असं म्हटलं आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष कार्यालयाच्या पायऱ्यांवर दिसत आहेत. यामध्ये एक महिला कार्यकर्ती वर जाऊन काही वेळ तिथे उभी राहते. त्यानंतर अमर किशोर कश्यप पायऱ्यांकडे येतात आणि त्या महिलेला मिठी मारताना दिसतात. मग दोघेही वरच्या मजल्यावर जातात. दुसऱ्या एका फुटेजमध्ये, एक वाहन कार्यालयाच्या आवारात प्रवेश करताना दिसत आहे, ज्यातून तीच महिला खाली उतरते. भाजपा जिल्हाध्यक्ष स्वतः गाडीचा गेट उघडतात आणि महिलेला आत घेतात.