केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 09:45 IST2025-10-23T09:44:39+5:302025-10-23T09:45:18+5:30
देवाच्या घरातच मोठा गैरकारभार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार केरळमधील सुप्रसिद्ध गुरुवायुर मंदिरात उघडकीस आला आहे.

केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
देवाच्या घरातच मोठा गैरकारभार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार केरळमधील सुप्रसिद्ध गुरुवायुर मंदिरात उघडकीस आला आहे. केरळमधील १२ मंदिरांची देखरेख करणाऱ्या गुरुवायुर देवस्वोम बोर्डाच्या ऑडिटमध्ये लाखो रुपयांचे मौल्यवान दागिने गायब झाल्याचे, तसेच एकूण २५ कोटी रुपयांच्या मालमत्तेत मोठी अनियमितता असल्याचे आढळून आले आहे.
काय आहे नेमका घोटाळा?
केरळ सरकारने २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन आर्थिक वर्षांसाठी गुरुवायुर देवस्वोम बोर्डाचे ऑडिट केले होते, ज्याचा अहवाल आता समोर आला आहे. या अहवालानुसार, मंदिरांमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या, चांदीच्या व हस्तीदंताच्या अनेक मौल्यवान वस्तू गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबतच, बोर्डाच्या 'गोल्ड स्कीम'मध्येही मोठा घोटाळा झाला असून, यामुळे मंदिराचे तब्बल ७९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.
हिशेबात २५ कोटींचा 'गोलमाल'
ऑडिट रिपोर्टमधील सर्वात गंभीर बाब म्हणजे, मंदिराच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे हिशेब व्यवस्थित ठेवलेले नाहीत. आय-व्यय खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबडी करण्यात आल्या आहेत. याशिवाय, मंदिरांमध्ये जमा असलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तूंचे योग्य प्रकारे व्हेरीफीकेशन करण्यात आलेले नाही. अहवालानुसार, एकूण २५ कोटी रुपयांच्या वस्तूंचा नेमका हिशोब ऑडिटमध्ये मिळू शकलेला नाही. म्हणजेच, या वस्तूंची तपासणी, नोंदी जुळवणे यांसारख्या प्रक्रियेत बोर्डाने अक्षम्य दिरंगाई केल्याचे दिसून आले आहे.मंदिरातून सोने-चांदी गायब झाल्याच्या आणि व्यवस्थापनातील या मोठ्या गैरप्रकारांमुळे भक्तांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
बोर्डाचा दावा; त्रुटी दूर केल्या
दरम्यान, गुरुवायुर देवस्वोम बोर्डाने ऑडिट रिपोर्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, "या अहवालात ज्या त्रुटी आणि कमतरता निदर्शनास आणल्या आहेत, त्या सर्व आता पूर्णपणे सुधारण्यात आल्या आहेत." यासंबंधीची संपूर्ण माहिती एका सविस्तर प्रतिज्ञापत्राद्वारे केरळ उच्च न्यायालयाला देण्यात आल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, केरळ सरकारनेही बोर्डाच्या या दाव्याशी सहमती दर्शवली असून, आवश्यक असलेले सर्व बदल करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र, कोट्यवधींच्या मालमत्तेचा हिशेब नसणे आणि लाखो रुपयांचे दागिने गायब होणे, यामुळे मंदिराच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.