'आम्ही जबाबदार नाही'; देश सोडून पळालेल्या गोव्यातील क्लब मालकांची कोर्टात धाव, जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 20:32 IST2025-12-10T20:31:05+5:302025-12-10T20:32:30+5:30
२५ जणांच्या मृत्यूनंतर देश सोडून पळालेल्या गोव्यातील क्लब मालकांची कोर्टात धाव

'आम्ही जबाबदार नाही'; देश सोडून पळालेल्या गोव्यातील क्लब मालकांची कोर्टात धाव, जामीन अर्ज फेटाळला
Goa Club Fire Case: गोव्यातील प्रसिद्ध बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबमध्ये रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण आगीत २५ जण मृत्यूमुखी पडल्यानंतर, देश सोडून पळून गेलेले क्लबचे मालक सौरभ लूथरा आणि गौरव लूथरा यांनी अटक टाळण्यासाठी दिल्लीतील कोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी कोर्टात आम्ही या घटनेचे बळी आहोत असे सांगत अटकपूर्व जामीन मिळवण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे.
आगीनंतर मालक परदेशात पसार
गोव्यातील नाईटक्लबला आग लागल्यानंतर काही तासांतच २० कर्मचारी आणि ५ पर्यटकांचा जीव गेला. त्यानंतर पाचच तासात क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लूथरा हे इंडिगोच्या विमानाने दिल्लीमार्गे थायलंडला पळून गेले होते. गोवापोलिसांनी त्यांच्याविरोधात आता इंटरपोलकडून ब्लू नोटीस जारी केली आहे, ज्यामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाईचा फास आवळला जात आहे.
'विक्टिम कार्ड' खेळत कोर्टात याचिका
पोलिसांचा फास आवळत असल्याचे पाहून घाबरलेल्या लूथरा बंधूंनी दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भारतात परतण्यापूर्वी आणि अटकेपासून वाचण्यासाठी त्यांना जामीन मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याचिकेच्या प्रतीनुसार, लूथरा बंधूंनी आपली बाजू मांडताना आगीच्या वेळी ते नाईट क्लबमध्ये उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर थेट गुन्हा लादला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला.
क्लबचे दैनंदिन कामकाज लूथरा बंधू नव्हे, तर त्यांचे तीन व्यावसायिक भागीदार आणि व्यवस्थापक सांभाळत होते. "लूथरा बंधू अनेक व्यवसायांशी जोडलेले आहेत, पण कोणत्याही युनिटचे दैनंदिन कामकाज ते वैयक्तिकरित्या हाताळत नाहीत. ज्या क्लबला आग लागली, तो देखील फ्रँचायझी व्यवस्थापनांतर्गत चालवला जात होता," असंही त्यांनी सांगितले.
क्लबच्या व्यवस्थापकाला गोवा पोलिसांनी आधीच अटक केली आहे. त्यामुळे, घटनेची जबाबदारी लूथरा बंधूंऐवजी क्लब चालवणाऱ्या भागीदारांची किंवा व्यवस्थापकांची आहे असाही दावा त्यांनी केला.
'आम्हीही पीडित आहोत'
लूथरा बंधूंचे वकील, ज्येष्ठ अधिवक्ता सिद्धार्थ लूथरा यांनी कोर्टात नमूद केले की, त्यांच्या पक्षकारांची मागणी खूप साधी आहे. त्यांना देशात परतण्याची आणि गोव्यातील स्थानिक कोर्टात हजर होण्याची परवानगी दिली जावी. त्यांनी म्हटले की, "आम्ही देखील या दुर्घटनेचे बळी आहोत आणि या घटनेने आम्ही व्यथित आहोत."
कोर्टाने लूथरा बंधूंना त्वरित दिलासा देण्यास नकार दिला असून, याप्रकरणी पोलिसांकडून उत्तर मागवले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी गुरुवारी होण्याची शक्यता आहे.