'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:31 IST2025-06-09T13:30:27+5:302025-06-09T13:31:51+5:30

Goa Health Minister: गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मुख्य डॉक्टरवर केलेल्या कारवाईनंतर मोठा वाद झाला.

Goa Health Minister: 'My words were wrong, not intentional...', Goa Health Minister apologizes to IMA and CMO | 'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

Goa Health Minister: गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (GMCH) मधील एका वरिष्ठ डॉक्टरशी झालेल्या वादानंतर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. शनिवारी राणे यांनी GMCH च्या आपत्कालीन वॉर्डमध्ये अचानक तपासणी केली आणि रुग्णाशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) डॉ. रुद्रेश कुटीकर यांच्यावर जागेवरच तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली होती. 

आरोग्यमंत्र्यांनी माफी मागितली
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर राणेंवर इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि विरोधी पक्षांकडून तीव्र टीका झाली. त्यानंतर विश्वजित राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना जाहीर माफी मागितली. ते म्हणाले, 'मी IMA आणि CMO यांची माफी मागू इच्छितो.' 

'राजकीय रंग देण्याचा हेतू नव्हता'
त्यांनी असेही म्हटले की, 'या मुद्द्याला राजकीय रंग देण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मी फक्त एका रुग्णाच्या बाजूने उभा राहिलो. रुग्णाचे दुःख मला समजते, कारण माझी आई स्वतः कर्करोगाची रुग्ण आहे. माझा हेतू बरोबर होता, पण माझे शब्द चुकीचे होते,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून निलंबनाचे आदेश मागे

वाद वाढल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यांनी एक्स अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'मी झालेल्या प्रकरणाचा आढावा घेतला आहे आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मी गोव्यातील लोकांना खात्री देऊ इच्छितो की डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबित केले जाणार नाही. राज्य सरकार आणि आमचे समर्पित वैद्यकीय पथक प्रत्येक नागरिकासाठी आरोग्यसेवेचे सर्वोच्च मानक सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. जीव वाचवणाऱ्या आमच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांचे आणि अमूल्य सेवेचे आम्ही कौतुक करतो', अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

काय आहे प्रकरण ?
शनिवारी विश्वजित राणे यांना एका ज्येष्ठ पत्रकाराकडून तक्रार मिळाली की त्यांच्या सासू सायटिकाने ग्रस्त असून, त्यांना जीएमसीएचच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये इंजेक्शन नाकारण्यात आले. राणे यांनी या तक्रारीच्या आधारे तात्काळ कारवाई केली आणि डॉ. कुटीकर यांना अतिशय टोकाच्या शब्दात फटकारले आणि त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.


 

 

Web Title: Goa Health Minister: 'My words were wrong, not intentional...', Goa Health Minister apologizes to IMA and CMO