दुसरी लस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या, केंद्राची राज्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 06:54 IST2021-05-09T03:16:18+5:302021-05-09T06:54:10+5:30
कोरोना लसीचा देशात तुटवडा निर्माण झाला असून, १५ मे नंतर लसींचा सर्वांना पुरेसा पुरवठा करण्यात येईल, असे उत्पादक कंपन्यांनी म्हटले आहे.

दुसरी लस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या, केंद्राची राज्यांना सूचना
नवी दिल्ली : ज्यांना कोरोनाची दुसरी लस टोचून घ्यायची आहे, त्यांना प्राधान्याने लस द्या, अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे. केंंद्राकडून पुरविण्यात येणाऱ्या लसींपैकी ७० टक्के लसी दुसऱ्यांदा लस घेणाऱ्यांना व ३० टक्के लसी पहिल्यांदा लस घेणाऱ्यांना दिल्या जाव्यात, असेही केंद्राने म्हटले आहे. (Give preference to second vaccinators, Centre's instructions to states)
कोरोना लसीचा देशात तुटवडा निर्माण झाला असून, १५ मे नंतर लसींचा सर्वांना पुरेसा पुरवठा करण्यात येईल, असे उत्पादक कंपन्यांनी म्हटले आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरणास अद्याप संपूर्ण क्षमतेने सुरुवात झालेली नाही. केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या व दिलेल्या मुदतीत लसीकरण पूर्ण करावे.
साखळी तोडण्यासाठी भारतात काही आठवड्यांचे लॉकडाऊन हवे - डॉ. अँथोनी फौसी
भारतात दररोज चार लाखांहून अधिक कोरोनाचे दैनंदिन रुग्ण आढळत आहेत. देशावरील कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतात काही आठवड्यांचा लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनातील प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथोनी फौसी यांनी दिला आहे. एका मुलाखतीत डॉ. फौसी यांनी भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, कोरोनाचा विषाणू ‘हिट अँड रन’प्रमाणे वागत आहे.
तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक
- भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. त्याबद्दल निश्चित अंदाज लावता येणार नाही. सध्याची दुसरी लाट कशा पद्धतीने हाताळतो, त्यावरही बरेच काही अवलंबून आहे. मात्र, व्यापक लसीकरण झाल्यास तिसरी लाट टाळता येणे शक्य आहे.