भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 14:13 IST2025-12-18T14:12:17+5:302025-12-18T14:13:50+5:30
संसद परिसरात नितीन गडकरी आणि प्रियंका गांधी यांच्यात झालेल्या भेटीची सध्या चर्चा होत आहे.

भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रत्येक दिवस वादळी ठरतोय. विविध मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळतात. अशातच, गुरुवारी संसद परिसरातून एक वेगळे दृष्य पाहायला मिळाले. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी चंदीगड-शिमला महामार्गासंदर्भात प्रश्न विचारत असताना, त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे थेट भेटीची वेळही मागितली.
गडकरींचे तात्काळ आणि अनपेक्षित उत्तर
आपला प्रश्न संपवताना प्रियंका गांधी हसत म्हणाल्या, सर, मी जूनपासून आपल्या भेटीसाठी वेळ मागतेय. माझ्या मतदारसंघातील काही कामांसाठी कृपया वेळ द्यावा. प्रियंकांच्या मागणीवर नितीन गडकरी यांनी तात्काळ उत्तर देत सांगितले, कुठल्याही अपॉइंटमेंटची गरज नाही. आमचे दरवाजे नेहमी खुले असतात. तुम्ही प्रश्नकाळ संपल्यानंतर थेट माझ्या संसद कार्यालयात या, मी तुमची पूर्णपणे बाजू ऐकून घेईन. गडकरींच्या या उत्तराने सभागृहात क्षणभर हलकेफुलके वातावरण निर्माण झाले.
Nitin Gadkari sat with Priyanka GANDHI Vadra and had breakfast with her.
— Prashant (@prashant10gaur) December 18, 2025
She was there for resolution of Road construction in her constituency in Waynad.pic.twitter.com/dqkNomHAoVhttps://t.co/9Gp54bzncL
प्रश्नकाळनंतर प्रत्यक्ष भेट
प्रश्नकाळ संपताच प्रियंका गांधी आणि नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेटही झाली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये मतदारसंघाशी संबंधित कामांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे, या भेटीत गडकरी यांनी प्रियंका गांधींना तांदळापासून बनवलेला पदार्थ खाण्यासही दिला, ज्याची संसद परिसरात चांगलीच चर्चा रंगली.
राजकीय वातावरणात सौहार्दाचा क्षण
राजकीय मतभेदांच्या पार्श्वभूमीवरही, लोकसभेत घडलेली ही घटना संवाद आणि सौहार्दाचे उदाहरण म्हणून पाहिली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील संवाद शक्य आहे, हे या प्रसंगातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.