गर्लफ्रेंडसह स्वतःच्याच मुलाचं अपहरण, अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 17:50 IST2017-09-13T17:48:58+5:302017-09-13T17:50:02+5:30
या अभिनेत्याचं मुस्कान नावाच्या एका महिलेसोबत लग्न झालं होतं. मुलाच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी एका प्रेमीयुगुलाला अटक केली आहे.

गर्लफ्रेंडसह स्वतःच्याच मुलाचं अपहरण, अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नवी दिल्ली, दि. 13 - दिल्लीच्या जामिया नगर येथील बाटला हाऊस परिसरातून दोन वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण झालं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका प्रेमीयुगुलाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा भोजपुरी चित्रपटांचा अभिनेता आहे. त्याने स्वतःच्याच मुलाचं अपहरण केलं होतं. दिल्ली पोलिसांनी चिमुकल्याची सुखरूप सुटका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बिहारच्या मुजफ्फरपूर येथील रहिवासी असून मोहम्मद शाहिद (23) असं त्याचं नाव आहे. त्याचं मुस्कान नावाच्या एका महिलेसोबत लग्न झालं होतं. मात्र, काही वर्षांमध्येच दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. दोघांना दोन वर्षांचा एक मुलगा आहे.
यानंतर शाहीद एका अन्य तरूणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. मुस्कानपासून वेगळं झाल्यामुळे मुस्कान शाहिदला आणि मुलाला भेटू देत नव्ह्ती. मुलाला भेटता येत नाही याचा राग शाहिदच्या मनात होता. त्यामुळे आपल्या लिव्ह-इन पार्टनरसोबत त्याने मुलाचं अपहरण करण्याचा कट रचला. त्याने मुस्कानला मुलाला घेऊन बाटला हाऊस येथे बोलावले. तेथे आल्यावर त्याने मुलाला आपल्या लिव्ह इन पार्टनरच्या हातात दिले आणि मुलाला घेऊन त्या तरूणीने तेथून पळ काढला.
घडलेल्या प्रकारामुळे मुस्कान गोंधळली. तिने मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार जामिआ नगर पोलीस स्थानकात केली. मुलाची माहिती देणा-यास 20 हजार रूपयांची घोषणा करण्यात आली होती. अखेर पोलिसांना या प्रकऱणाचा छडा लावण्यात यश आलं आहे. त्यांनी या प्रेमीयुगुलाला अटक केली आहे.