चालताना तलावात घसरुन पडली मुलगी; वाचवायला गेलेल्या आई आणि भावासह पाच जणांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:25 IST2025-02-10T16:18:54+5:302025-02-10T17:25:29+5:30
गुजरातमध्ये एका मुलीला वाचवताना कुटुंबातील इतर सदस्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.

चालताना तलावात घसरुन पडली मुलगी; वाचवायला गेलेल्या आई आणि भावासह पाच जणांचा बुडून मृत्यू
Gujarat Accident:गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुडणाऱ्या एकाला वाचवण्याचा नादात कुटुंबातील अन्य सदस्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुजरातच्या पाटण येथील वडवली गावातील तलावात बुडून ५ जणांचा मृत्यू झाला. तलावाजवळून जात असताना एका कुटुंबातील मुलगी घसरली आणि बुडू लागली. मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिची आई आणि भावासह अन्य दोन जणही बुडाले. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली आहे.
पाटण जिल्ह्यातील चाणस्मा तालुक्यातील वडवली गावाच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. मृत्यू झालेले सर्वजण एकाच गावातील होते. त्यांच्या शेळ्या तलावाजवळ चरत असताना पाच जणांपैकी एका मुलीचा पाय घसरला आणि ती तलावात पडली. बाकीच्यांनी तिला वाचवण्यासाठी तलावात उडी मारली पण कोणीही बाहेर येऊ शकले नाही. सर्वांचाच बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून चार मुलांसह पाच जणांना तलावातून बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी करुन सर्वांना मृत घोषित केलं.
गावातील एका कुटुंबातील काहीजण शेळ्या चरायला गेले होते. रात्री उशिरा घरी परतत असताना हे कुटुंब एका तलावाजवळून जात होते. तेव्हा अचानक मुलीचा पाय घसरला आणि ती तलावात पडली. मुलीला वाचवण्यासाठी भाऊ व तिच्या आईनेही तलावात उडी मारली. मात्र पाण्याची खोली न कळल्याने एक एक करत कुटुंबातील ३ जणांसह एकूण ५ जण तलावात बुडाले. फिरोजा मलेक, तिची दोन मुले अब्दुल आणि मेहरा यांच्यासह गावातील सिमरन आणि सोहेल यांच्यासह पाच जणांचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेनंतर तिथे पोहोचलेल्या गावकऱ्यांना तलावाबाहेर पडलेल्या चप्पलवरून काही तरी घडल्याचा अंदाज आला. कोणी तरी बुडाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर गावकऱ्यांनी तलावातून पाच मृतदेह बाहेर काढून रुग्णलायात नेले.
दरम्यान, महिन्याभरापूर्वी उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातही असाच प्रकार घडला होता. गंगा नदीत स्नान करताना एकाच कुटुंबातील चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेत आधी दोन जण बचावले होते. मात्र, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण खोल पाण्यात गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.