MP News: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये जन्मलेली एक मुलगी चर्चेत आली आहे. १३ ऑगस्ट रोजी मोथापुरा गावातील महिलेने एका विशेष मुलीला जन्म दिला. या मुलीला दोन डोके, चार हात आणि दोन हृदये आहेत, तर तिची छाती आणि पोट जोडलेले आहे. तर, मुलीला दोन सामान्य पायदेखील आहेत. सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टर तिच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीची प्रसूती एमटीएच रुग्णालयात झाली. मात्र, गंभीर स्थिती पाहून तिला एमवाय हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. मुलीला एमवाय हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांचे विशेष पथक तिच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे आणि तिची दोन्ही हृदये सामान्यपणे काम करत आहेत. मात्र, पुढील स्थिती तपासण्यासाठी सोनोग्राफी आणि इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत.
वैद्यकीय भाषेत याला काय म्हणतात?वैद्यकीय भाषेत अशा जोडलेल्या जुळ्या मुलांना 'कंजॉइंड ट्विन्स' म्हणतात. अशी परिस्थिती खूप गुंतागुंतीची मानली जाते. त्यामुळेच अशा मुलांची शस्त्रक्रिया करणे खूप कठीण आणि धोकादायक असते. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर सहा महिन्यांनंतर मुलीची प्रकृती अनुकूल राहिली, तर शस्त्रक्रियेच्या मदतीने तिचे शरीर वेगळे केले जाऊ शकते. तथापि, ही प्रक्रिया खूप संवेदनशील आणि गुंतागुंतीची असेल.