मोठी दुर्घटना! सापामुळे बोट बुडाली, 17 जण करत होते प्रवास; 7 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 16:10 IST2022-09-02T16:04:54+5:302022-09-02T16:10:45+5:30
एका बोटीतून 17 जण प्रवास करत होते, त्यावेळी अचानक त्या बोटीमध्ये साप शिरला.

मोठी दुर्घटना! सापामुळे बोट बुडाली, 17 जण करत होते प्रवास; 7 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गाझीपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका बोटीतून 17 जण प्रवास करत होते, त्यावेळी अचानक त्या बोटीमध्ये साप शिरला. सापाबद्दल समजताच होडीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे बोटीचा बॅलेन्स गेला आणि ती पाण्यात पलटी झाली. या दुर्घटनेत 17 जण बुडाले. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. पाच जणांचे मृतदेह हे एनडीआरएफला मिळाले आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून सात जणांचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती जाहीर करण्यात आली तर त्यानंतर एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तब्येत बरी झाल्यानंतर व्यक्तीला घरी सोडण्यात आले. बुडालेल्या काही जणांचा शोध घेण्याचं काम अजूनही सुरू असल्याचे एनडीआरएफच्या टीमकडून सांगण्यात आले.
मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तिचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या बोट दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची आर्थिक मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. याआधी देखील बोट बुडाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.