तिसऱ्या तिमाहीत जीडीपीत 0.4 टक्के वाढ; औद्याेगिक उत्पादनही ०.१ टक्के वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 00:21 IST2021-02-27T00:21:37+5:302021-02-27T00:21:53+5:30
वाढीचे संकेत : औद्याेगिक उत्पादनही ०.१ टक्के वाढले

तिसऱ्या तिमाहीत जीडीपीत 0.4 टक्के वाढ; औद्याेगिक उत्पादनही ०.१ टक्के वाढले
नवी दिल्ली : काेराेना महामारीमुळे काेलमडलेल्या अर्थव्यवस्थेत सुधारणांचे संकेत मिळत आहेत. सलग दाेन तिमाहींमध्ये घसरण झाल्यानंतर जीडीपीमध्ये ऑक्टाेबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत ०.४ टक्के वाढ झाली आहे. तसेच आठ प्रमुख उद्याेगांचे उत्पादन ०.१ टक्क्यांनी वाढले आहे. काेराेनामुळे आतापर्यंत जीडीपी आणि औद्याेगिक उत्पादनात सातत्याने घट झाली हाेती. मात्र, दाेन्ही घटकांमध्ये सकारात्मक वाढ दिसून आली आहे.
गेल्या आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये ३.३ टक्के वाढ नाेंदविण्यात आली हाेती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात जीडीपी ८ टक्के घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात जीडीपी ४ टक्क्यांनी वाढला हाेता. काेराेना महामारीच्या नियंत्रणासाठी देशव्यापी लाॅकडाऊन लावण्यात आले हाेते. त्यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत २४.४ टक्के तर जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत ७.३ टक्के घट नाेंदविण्यात आली हाेती.
उत्पादनात जानेवारीपर्यंत झाली आहे घट
खते, स्टील आणि वीज उत्पादन २.७ टक्क्यांनी वाढले. तर काेळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि सिमेंट उत्पादनात २.२ टक्के घट नाेंदविण्यात आली. चालू आर्थिक वर्षात जानेवारीपर्यंत उत्पादन ८.८ टक्क्यांनी घटले हाेते. तर यापूर्वीच्या आर्थिक वर्षात याच कालावधीत उत्पादनात ०.८ टक्के वाढ झाली हाेती.