गौतम खेतान याच्याविरोधात आणखी चार आरोपपत्रे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 06:00 IST2019-06-12T05:59:19+5:302019-06-12T06:00:14+5:30
अगुस्ता वेस्टलँड प्रकरण; अघोषित बँक खाती बाळगल्याचा आरोप

गौतम खेतान याच्याविरोधात आणखी चार आरोपपत्रे दाखल
नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील एक आरोपी गौतम खेतान याच्याविरुद्ध प्राप्तिकर विभागाने आणखी चार नवी आरोपपत्रे दाखल केली आहेत. करचोरी करणे आणि सिंगापूरमध्ये अघोषित बँक खाती बाळगणे, असे आरोप त्याच्यावर ठेवले आले आहेत.
प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात येथील विशेष न्यायालयात खेतान याच्याविरुद्ध प्राप्तिकर कायद्याच्या कलम २७६ सी (१) (हेतूत: कर भरणा टाळणे) आणि २७७ (शपथेवर खोटे बोलणे) अन्वये चार पुरवणी आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. त्यांच्याविरुद्ध
२०१८ मध्ये किमान नऊ आरोपपत्रे दाखल झाली आहेत. विदेशात अघोषित मालमत्ता बाळगणे आणि सर्व मालमत्ता व उत्पन्न जाहीर न करणे, असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.
सूत्रांनी सांगितले की, खेतान याची सिंगापुरात तीन बँक खाती असल्याचा नवा पुरावा कर अधिकाऱ्यांच्या हाती आला आहे. त्यावरून त्याच्याविरुद्ध चार नवी आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. ही आरोपत्रे २००९-१० ते २०१२-१३ या काळातील आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहेत. ही बँक खाती खेतानने भारतीय प्राप्तिकर खात्यापासून लपवून ठेवली होती. त्यात महत्त्वपूर्ण कर्ज नोंदी आणि वित्तीय व्यवहार आहेत.
तिहार तुरुंगात
मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर खेतानला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी तिहार तुरुंगात जाऊन त्याचा जबाब घेतला होता. गौतम खेतान याच्या विरोधात प्राप्तिकर विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्रांची संख्या आता १३ झाली आहे.