"तुझ्यासारख्या श्वानाला..."; फोनवरुन धमकावणाऱ्या दहशतवाद्याला पोलीस अधिकाऱ्याने फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 14:43 IST2024-12-31T14:37:06+5:302024-12-31T14:43:49+5:30
गँगस्टर गोल्डी ब्रारने फोनवरुन पंजाब पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कडक इशारा दिला आहे.

"तुझ्यासारख्या श्वानाला..."; फोनवरुन धमकावणाऱ्या दहशतवाद्याला पोलीस अधिकाऱ्याने फटकारले
Gangster Goldy Brar : कॅनडातील गुंड आणि गुन्हेगारी टोळीचा प्रमुख गोल्डी ब्रारला पंजाबचे पोलीस उपअधीक्षक बिक्रम सिंग यांनी चांगलेच फटकारले आहे. गोल्डी ब्रार याच्याशी बिक्रम सिंह यांच्या फोन कॉल संभाषणाचा ऑडिओ व्हायरल होत आहे. या कॉलमध्ये गोल्डी ब्रार सुरुवातीला पोलीस उपअधीक्षक बिक्रम सिंग यांना धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे ऐकू येत आहे. पोलिसांनी आपल्या टोळीत अनेक गुप्तहे पेरले असल्याचा दावा गोल्डी ब्रारने केला. त्यामुळे याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा गोल्डी ब्रारने दिला. त्यामुळे संतापलेल्या बिक्रम सिंग यांनी गोल्डीला चांगलेच सुनावले.
पंजाब पोलीस दलात माजी सहायक उपनिरीक्षकाचा मुलगा असलेला सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार याच्यावर अनेक गंभीर आरोपांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचा कट रचल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. गोल्डी ब्रार हा अनेक गुन्ह्यांमध्ये सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. गोल्डी कॅनडात बसून भारतात कारवाया करत असल्याचे अनेकदा उघड झालं आहे. मात्र यावेळी गोल्डी ब्रारने थेट पोलीस उपअधीक्षकांना धमकावल्याने याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
व्हायरल होत असलेल्या कॉलमध्ये बिक्रम सिंग म्हणत आहेत की या नंबरवरून मला याआधीही अनेक कॉल आले आहेत. त्यामुळे यापूर्वीही गोल्डीने डीएसपी बिक्रम सिंग यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी फोन उचलला नाही. यानंतर दुसऱ्याच दिवशी गोल्डीने पुन्हा बिक्रम सिंग यांना फोन करुन धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलताना बिक्रम सिंग यांनी, "पोलीस आपले काम करत आहेत. आम्ही आमचे काम कायद्यानुसार करत आहोत. बेकायदेशीर काम करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराला आम्ही सोडणार नाही," असं म्हटलं.
"आमच्यासाठी तू किंवा इतर गुंड श्वान किंवा गाढवा समान आहात. जर तुम्ही तुमचा मार्ग बदलला नाही, तर तुम्हाला इतरांसारखेच परिणाम भोगावे लागतील. तुझ्या टोळीचे सदस्य भ्याड आहेत आणि ते मुलींवर अत्याचार करतात. तुमच्या टोळीतील अंकित याने स्वत:ला पोलिसांपासून वाचवण्यासाठी अल्पवयीन मुलींवरही गोळीबार केला.
काही महिन्यांपूर्वी गृह मंत्रालयाने गोल्डी ब्रारला दहशतवादी घोषित केले होते. गोल्डी ब्रार पाकिस्तानच्या एजन्सीच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे सरकारचे मत आहे. त्याने अनेक लोकांची हत्या केली असून विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर आलं आहे.