'जोधपूरमध्येच सलमान खानला संपवणार', गँगस्टर बिष्णोईने दिली जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 17:31 IST2018-01-06T17:23:55+5:302018-01-06T17:31:40+5:30
अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

'जोधपूरमध्येच सलमान खानला संपवणार', गँगस्टर बिष्णोईने दिली जीवे मारण्याची धमकी
जोधपूर- अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राजस्थानमधील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका उद्योगपतीच्या हत्येच्या आरोपाखाली बिष्णोईला शुक्रवारी जोधपूर जिल्हा कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याने सलमान खानला मारण्याची धमकी दिली. सलमानला मी जोधपूरमध्येच संपवणार, असंही बिष्णोईने म्हटलं आहे. या धमकीचा संबंध काळवीट शिकार प्रकरणाशी जोडला जातो आहे.
बिष्णोई याच्यावर हत्येचा प्रयत्न, खंडणी व बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणं अशा प्रकारचे २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. 'माझी काहीच चूक नसून मला पोलीस जबरदस्ती आरोपांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं बिष्णोईने म्हंटलं आहे. जोधपूर पोलिसांनी बिष्णोईच्या धमकीची गंभीर दखल घेतली आहे. सलमानला आवश्यक तेव्हा पुरेशी सुरक्षा पुरविली जाईल, असं पोलीस आयुक्त अशोक राठोड यांनी स्पष्ट केले आहे.
कुख्यात गँगस्टर बिष्णोईला जोधपूर पोलिसांनी गोळीबाराच्या दोन घटनात अटक केली होती. त्यानंतर जोधपूरमधील इलेक्ट्रॉनिक व्यवसायिक वासुदेव इसराणी यांच्या हत्येत सहभाग असल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.