रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 19:01 IST2025-12-24T19:00:25+5:302025-12-24T19:01:39+5:30
Crime News: ट्रेनमधून प्रवास करत असताना प्रवाशांकडील सामान आणि मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याच्या घटना घडत असतात. दरम्यान, केरळच्या माजी आरोग्यमंत्री आणि माजी लोकसभा खासदार पी.के. श्रीमती यांनाही ट्रेनमधील चोरीचा फटका बसल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
ट्रेनमधून प्रवास करत असताना प्रवाशांकडील सामान आणि मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याच्या घटना घडत असतात. दरम्यान, केरळच्या माजी आरोग्यमंत्री आणि माजी लोकसभा खासदार पी.के. श्रीमती यांनाही ट्रेनमधील चोरीचा फटका बसल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. पी.के. श्रीमती ह्या रेल्वेमधून कोलकाता येथून बिहारला जात असताना त्यांच्याकडील मौल्यवान वस्तूंची चोरी झाली. या चोरीमुळे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेबाबत श्रीमती यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी बिहारमधील समस्तीपूर येथे जात होते. प्रवासात बुधवारी सकाळी ५.४५ च्या सुमारास मला जाग आली. तेव्हा चोरीची ही घटना उघडकीस आली. झोपताना डोक्याजवळ ठेवलेली हँडबॅग चोरीला गेली होती. या हँडबॅगमध्ये सुमारे ४० हजार रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल आणि काही आवश्यक कागदपत्रे होती. तर कपडे वेगळ्या बॅगेत ठेवले होते. ती बॅग सुरक्षित होती.
श्रीमती ह्या ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी कोलकाता येथे दोन दिवस राहिल्या होत्या. तसेच आपण आपल्या संपूर्ण जीवनात असं कधीच पाहिलं नव्हतं, असेही त्यांनी सांगितले. सकाळी डब्यातून प्रवास करणारे अनेक प्रवासी उतरले. तेव्हाच आपली एक बॅग गायब असल्याचे श्रीमती यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना कल्पना देण्याचा प्रयत्न केला. मात्र टीटीई डब्यात उपस्थित नव्हता.
श्रीमती ह्यांनी याबाबत आणखी एका रेल्वे अधिकाऱ्याला गाठून चोरीबाबत माहिती दिली. त्यानंतर चेन खेचली गेली. तसेच ट्रेन थांबवण्यात आली. मात्र त्वरित कुठलीही कारवाई केली गेली नाही. पुढे एका स्टेशनवर ट्रेन थांबवल्यावर आणखी काही प्रवासीसुद्धा त्यांच्या बॅग चोरीला गेल्याची तक्रार करत असल्याचे श्रीमती यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा सामुहिक चोरीचा प्रकार असावा, अशा संशय श्रीमती यांनी व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांनी चोरीबाबत सुरुवातील दिलेल्या उत्तरांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच चोरीसाठी प्रवासीच जबाबदार असल्यासारखं वर्तन अधिकारी करत होते, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, सुरक्षेच्या उपाय योजनातील चुकीमुळे वैतागलेल्या श्रीमती यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर रेल्वे प्रशासन कार्यान्वित झालं. तसेच डीजीपींसह आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर लेखी तक्रार देण्यात आली. तसेच या प्रकरणाचा तपास केला जात असल्याचे आरपीएफने सांगितले.