भारतीय सैन्य पाकिस्तानला त्यांच्या मित्र देशांकडून मिळणाऱ्या इंधन पुरवठ्यावर आणि तेथे तैनात असलेल्या त्यांच्या युद्धनौकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पहलगाम हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानमध्ये इंधनाचा तुटवडा जाणवत होता आणि त्यावेळी त्यांच्याकडे इंधनाचे मर्यादित साठे होते, अशी माहिती समोर आली होती.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. या दरम्यान पाकिस्तानने इंधन आणि तेलासाठी मित्र राष्ट्रांकडून मदत मागण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तैनात असलेली भारताची देखरेख यंत्रणा कराची आणि इतर पाकिस्तानी बंदरांना इंधन आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
पाकिस्तानी नौदलावर आणि पाकिस्तानच्या इतर हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदलाने त्यांचे P-8I आणि MQ-9B हे ड्रोन या प्रदेशात तैनात केले आहेत. भारताचे उपग्रह पाकिस्तानचे मित्र मानल्या जाणाऱ्या इतर नौदलांच्या हालचालींवरही बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव वाढला!२२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये २६ लोक ठार झाले आणि १७ लोक जखमी झाले. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध होते, ज्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक पावले उचलली.
पाकला मोठा धक्का!भारताने १९६० मध्ये पाकिस्तानसोबत झालेला सिंधू पाणी करार स्थगित केला आहे, ज्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. भारताने पाकिस्तानसोबतच्या राजनैतिक संबंधांवर कडक निर्बंध घातले आहेत आणि सर्व प्रकारच्या व्यापारावर पूर्णपणे बंदी घातली आहे. या हल्ल्यानंतर, पाकिस्तान आता भारताच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्याची भीती बाळगून आहे. त्यांचे मंत्री सतत भारताच्या संभाव्य हल्ल्याबद्दल बोलत आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोमवारी इशारा दिला होता की, भारत कधीही काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) लष्करी हल्ला करू शकतो. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, 'भारत नियंत्रण रेषेवर कुठेही हल्ला करू शकतो अशा बातम्या येत आहेत. भारताच्या कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर दिले जाईल'. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनरो यांनीही म्हटले की, ते आपल्या जनतेचे रक्षण करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देतील.