Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 17:03 IST2025-12-28T17:02:48+5:302025-12-28T17:03:44+5:30
Mehbooba Mufti: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली.

Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली. "महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते, तो भारत आता 'लिंचिस्तान'मध्ये बदलला आहे," असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे. अनंतनाग येथे आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले.
देशाच्या विविध राज्यांमध्ये घडणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांचा संदर्भ देत मुफ्ती यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, भारतात सध्या भीती आणि असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटना केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसून, त्या सामान्य लोकांच्या सुरक्षिततेला आणि प्रतिष्ठेला धोकादायक आहेत.
मेहबूबा मुफ्ती काय म्हणाल्या?
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, "स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी ज्या मूल्यांवर हा देश उभा केला, त्या मूल्यांना जमावाच्या हिंसाचारामुळे धक्का पोहोचत आहे. लोकांची सुरक्षा आणि सन्मान राखणे ही कोणत्याही सरकारची प्राथमिक जबाबदारी असते, मात्र सध्या लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. हे भीतीचे वातावरण केवळ समाजासाठीच नाही, तर देशाच्या भविष्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत घातक आहे. देशाला या विखारी वातावरणातून बाहेर काढण्यासाठी आता गंभीर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे."
राजकीय वाद पेटण्याची शक्यता
मेहबूबा मुफ्ती यांनी वापरलेल्या 'लिंचिस्तान' या शब्दामुळे राजकीय वर्तुळात मोठे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः भाजप आणि सत्ताधारी पक्षाकडून या विधानाचा तीव्र निषेध केला जाऊ शकतो.