पत्नीविषयी अपशब्द वापरल्याने मित्राचा तिघांकडून खून, कुपवाडमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 23:23 IST2025-07-23T23:23:07+5:302025-07-23T23:23:36+5:30
Sangli Crime News: कुपवाडमधील रामकृष्णनगर येथे घरात पार्टी रंगात आली असताना पत्नीविषयी अपशब्द वापरल्यामुळे अमोल सुरेश रायते (वय ३२, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) या सेंट्रिंग कामगाराचा चाकू, कुऱ्हाडीने डोक्यात व चेहऱ्यावर वार करून खून करण्यात आला.

पत्नीविषयी अपशब्द वापरल्याने मित्राचा तिघांकडून खून, कुपवाडमधील धक्कादायक घटना
कुपवाड - कुपवाडमधील रामकृष्णनगर येथे घरात पार्टी रंगात आली असताना पत्नीविषयी अपशब्द वापरल्यामुळे अमोल सुरेश रायते (वय ३२, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) या सेंट्रिंग कामगाराचा चाकू, कुऱ्हाडीने डोक्यात व चेहऱ्यावर वार करून खून करण्यात आला. हा प्रकार बुधवार पहाटेच्या सुमारास घडला. या खूनप्रकरणी संशयित प्रेम बाळासाहेब मद्रासी (वय २४), तेजस संजय रजपूत (वय २५, दोघे रा. रामकृष्णनगर) व निहाल असिफ बावा (वय २०, रा. शामरावनगर, सांगली) या तिघांना अटक करण्यात आली आहे. मित्राच्याच घरात त्याचाच खून केल्याच्या घटनेने कुपवाड परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी फिर्यादीवरून दिलेली माहिती अशी, मृत अमोल रायते हा सेंट्रिंग कामगार म्हणून कार्यरत होता. रामकृष्णनगरमधील स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागे एकटाच राहात होता. अमोल रायते याची आई व भाऊ हे वेगळे राहत होते. अमोल याचा दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. परंतू पत्नी गेल्या काही दिवसांपासून स्वतंत्र राहत होती. मंगळवारी रात्री मृत अमोलच्या घरी पार्टी करण्याचे चौघांनी ठरवले. अमोल आणि संशयित प्रेम, तेजस, निहाल यांची पार्टी ऐन रंगात आली होती. चौघांच्या गप्पागोष्टी रंगल्या होत्या. तेव्हा अमोल याने प्रेम याच्या पत्नीविषयी अपशब्द वापरले. त्यामुळे त्याला राग आला. यावरून अमोल आणि इतर तिघांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली. मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास अमोलला घरापासून जवळच असलेल्या स्वामी समर्थ मंदिरासमोरील रस्त्यावर आणून चाकू, कुऱ्हाडीने डोक्यात, छातीवर वार करण्यात आले. अमोल गंभीर जखमी होऊन निपचिप पडल्याचे दिसून येताच संशयित तेथून पसार झाले.
बुधवारी सकाळी खुनाची माहिती समजताच परिसरात गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
दोघे गुन्हे अन्वेषणकडून ताब्यात
गुन्हे अन्वेषणच्या पथकातील कर्मचारी सागर लवटे, अमिरशा फकीर यांना संशयित प्रेम आणि तेजस हे दोघे सावळी येथे आल्याची माहिती मिळताच दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत तिघांनी मिळून खून केल्याची कबुली दिली. तिसरा संशयत निहाल बावा याला कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
भावाकडून फिर्याद
मृत अमोल रायते याचा भाऊ अभिजीत सुरेश रायते याने खून प्रकरणी कुपवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिघांना तत्काळ अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.