अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल; UGC-NAAC ने उघड केल्या मोठ्या अनियमितता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 17:33 IST2025-11-16T17:32:56+5:302025-11-16T17:33:18+5:30
Delhi Blast update: तपास यंत्रणांनी स्फोटाच्या कटाचा छडा लावत असताना, विद्यापीठाच्या कामकाजात अनेक गंभीर त्रुटी आढळल्या.

अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल; UGC-NAAC ने उघड केल्या मोठ्या अनियमितता
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या स्फोटातील 'व्हाईट कॉलर' दहशतवादी मॉड्यूलशी थेट जोडले गेलेले फरिदाबाद येथील 'अल-फलाह विद्यापीठ' आता केवळ दहशतवादी कारवायांसाठीच नाही, तर मोठ्या आर्थिक अनियमितता आणि फसवणुकीच्या आरोपाखालीही कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे.
तपास यंत्रणांनी स्फोटाच्या कटाचा छडा लावत असताना, विद्यापीठाच्या कामकाजात अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. यानंतर युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद या नियामक संस्थांनी केलेल्या तक्रारींच्या आधारावर दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने विद्यापीठाच्या व्यवस्थापनावर फसवणूक आणि बनावटगिरीच्या आरोपाखाली दोन स्वतंत्र एफआयआर नोंदवले आहेत.
गुन्हेगारी आणि शैक्षणिक फसवणूक
तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका बाजूला विद्यापीठात कार्यरत असलेले डॉ. उमर उन नबी आणि डॉ. मुझम्मिल शकील यांसारखे उच्चशिक्षित डॉक्टर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी 'व्हाईट कॉलर' नेटवर्क चालवत होते. तर, दुसरीकडे हेच विद्यापीठ शैक्षणिक नियमांचे उल्लंघन करून मोठ्या अनियमितता करत होते.