"पप्पाने मम्मीला लटकवले, ती बोलत नाहीये"; मुलीने व्हिडिओ कॉल करून आजीला दाखवला आईचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 20:02 IST2025-02-06T20:01:25+5:302025-02-06T20:02:56+5:30
उत्तर प्रदेशमध्ये पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर मुलीने व्हिडीओ कॉल करुन याची माहिती आजीला दिली.

"पप्पाने मम्मीला लटकवले, ती बोलत नाहीये"; मुलीने व्हिडिओ कॉल करून आजीला दाखवला आईचा मृतदेह
Moradabad Crime:उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधून अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे. मुरादाबादमध्ये बुधवारी एका ४ वर्षाच्या निष्पाप मुलीने आजीला व्हिडिओ कॉल करून तिच्या आईचा मृतदेह दाखवला. वडिलांनी आईला लटकवल्याचे फोनवर निष्पाप मुलाने आजीला सांगितले. आई काहीच बोलत नाहीये असं चिमुकली आजीला फोनवर सांगत होती. महिलेच्या आईने मुरादाबाद पोलिसांना या सगळ्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि महिलेच्या पतीला अटक केली.
मृत महिलेच्या कुटुंबीयांना संपूर्ण घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ मुरादाबाद पोलिसांना माहिती दिली. कुटुंबीयांनी मुलीच्या पतीवर आरोप करत पोलिसात तक्रार दिली. महिलेच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह तिच्या पतीने लटकवला होता, असा आरोप केला. त्यानंतर कुटुंबियांनी गाजियाबाद येथून मुरादाबाद गाठलं.
गाजियाबादच्या रुबी राणी हिचा विवाह २०१९ मध्ये रोहित कुमार याच्याशी झाला होता. रुबी भिकनपूर कुलवाडा येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. तर रोहित एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो घरुनच ऑफिसचे काम करत होता. रुबी तिचा पती आणि चार वर्षांची मुलगी ओजस्वीसोबत बुद्धी विहारमध्ये भाड्याच्या घरात राहत होते.
बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ओजस्वीने आजीला व्हिडिओ कॉल केला. आई लटकत असल्याचे तिने आजीला सांगितले. ती माझ्याशी बोलत नाही, असेही मुलीने आजीला सांगितले. रुबीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यावर कुटुंबियांना धक्काच बसला. रुबीच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. रोहित रोज रुबीला मारहाण करायचा, असा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. रुबीचा खून करून त्यानेच मृतदेह फासावर लटकवला होता, असेही कुटुंबियांनी सांगितले.
रोहितला विकायचं होतं घर
रुबी आणि रोहित यांचे मोदीनगरमध्ये घर आहे. यापूर्वी दोघेही या घराचा हप्ता भरत होते मात्र रोहितने हप्ता भरणे बंद केले. यानंतर रुबी एकटीच हप्ते भरत होती. याशिवाय रोहित रुबीवर तिच्या आई-वडिलांकडून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत असे. कुटुंबियांनी १५ हजार रुपयेही दिले होते. यानंतरही रोहितने रुबीला त्रास देणे थांबवले नाही. त्याचा विविध प्रकारे छळ सुरुच होता. बुधवारी देखील रोहितने रुबीच्या खात्यातून ५० हजार रुपये यूपीआयच्या माध्यमातून स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले होते.