धक्कादायक ! खड्ड्यात एकावर एक पुरलेले आढळले कुटुंबातील चौघांचे मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 09:26 IST2018-08-02T09:14:05+5:302018-08-02T09:26:22+5:30

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे घरामागील खड्ड्यात मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

four members of family found buried in pit over each other in kerala | धक्कादायक ! खड्ड्यात एकावर एक पुरलेले आढळले कुटुंबातील चौघांचे मृतदेह

धक्कादायक ! खड्ड्यात एकावर एक पुरलेले आढळले कुटुंबातील चौघांचे मृतदेह

तिरुअनंतपुरम - चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे घरामागील एका खड्ड्यात मृतदेह आढळल्यानं परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील हा धक्कादायक प्रकार आहे. घरामागील एका खड्ड्यामध्ये चौघांचे मृतदेह एकावर एक पुरण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांना मृतदेहांवर जखमादेखील आढळून आल्या आहेत. कृष्णनन (वय 52 वर्ष), पत्नी सुशीला (वय 50 वर्ष), मुलगी अर्शा (वय 21 वर्ष) आणि मुलगा अर्जुन (वय 19 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. 

गेल्या चार दिवसांपासून हे संपूर्ण कुटुंब अचानक बेपत्ता झाल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडनमुडीमध्ये राहणाऱ्या या कुटुंबीयांची 29 जुलैनंतर हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. शेजारी आणि नातेवाईक त्यांच्या घराजवळ गेले असता त्यांना जमीन आणि भिंतीवर रक्ताचे डाग दिसले. यानंतर तातडीनं पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना घरामागील एका खड्ड्यामध्ये या चार जणांचे मृतदेह एकावर एक पुरल्याचे आढळून आले. यावेळी मृतदेहांवर जखमादेखील त्यांना दिसल्या. दरम्यान, मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


Web Title: four members of family found buried in pit over each other in kerala