अंबानी कुटुंबाच्या चार पिढ्यांचे कुंभमेळ्यात पवित्र स्नान, हे सदस्य होते उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 21:57 IST2025-02-11T21:56:04+5:302025-02-11T21:57:39+5:30
यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई, मुले, सुना, नातू, आदी कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते...

अंबानी कुटुंबाच्या चार पिढ्यांचे कुंभमेळ्यात पवित्र स्नान, हे सदस्य होते उपस्थित
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा तथा आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी आज आपल्या कुटुंबीयांसह प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई, मुले, सुना, नातू, आदी कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. अर्थात अंबानी कुटुंबातील ४ पिढ्यांनी एकाच वेळी संगमावर पवित्र स्नान केले. तसेच यावेळी त्यांनी माता गंगेची पूजाही केली.
4 पिढ्यांचे एकाच वेळी पवित्र स्नान -
या कुंभमेळ्यात मुकेश अंबानी यांच्यासह त्यांच्या मातोश्री कोकिलाबेन, मुले आकाश आणि अनंत, सुना श्लोका आणि राधिका तसेच, आकाश आणि श्लोका यांची मुले पृथ्वी आणि वेदा यांच्याशिवाय, मुकेश अंबानी यांची बहिण दीप्ती सळगावकर आणि नीना कोठारी, तसेच सासूबाई पूनमबेन दलाल आणि साली ममताबेन दलाल यांनीही पवित्र स्नान केले.
अंबानी कुटुंबाच्या चार पीढ्यांनी कोट्यवधी भाविकांसोबत गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर पवित्र स्नान केले. यावेळी, निरंजनी आखाड्याचे स्वामी कैलाशानंद गिरीजी महाराज यांनी गंगा पूजन केले. यानंतर, अंबानी यांनी परमार्थ निकेतन आश्रमाचे स्वामी चिद्दानंद सरस्वती महाराज यांची भेट घेतली. यावेळी अंबानी कुटुंबाने आश्रमात मिठाई आणि लाईफ जॅकेट वाटपही केले.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या 'तीर्थ यात्री सेवा' उपक्रमाच्या माध्यमाने कुंभमेळ्यातील यात्रेकरूंना सेवा पुरवत आहे. तसेच 'वी केअर' या तत्वज्ञानानुसार, यात्रेकरूंना मोफत भोजन, आरोग्य सेवा वाहतूक सेवा, कनेक्टिविटी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मोफत लाइफ जॅकेट पुरवले जात आहेत.