खेळता खेळता चार चिमुकले कारमध्ये अडकले; संध्याकाळी चौघांचे मृतदेह आढळले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 17:20 IST2024-11-04T17:20:23+5:302024-11-04T17:20:33+5:30
कारमध्ये अडकून एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

खेळता खेळता चार चिमुकले कारमध्ये अडकले; संध्याकाळी चौघांचे मृतदेह आढळले...
Gujarat News : गुजरातच्या अमरेलीमध्ये हृदयाला पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. कारमध्ये अडकून एकाच कुटुंबातील चार चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला आहे. अमरेलीतील रंधिया गावात रविवारी(दि.3) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चारही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. अमरेलीचे पोलीस उपायुक्त चिराग देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दुर्घटनेच्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या दुर्घटनेचे खरे कारण शोधण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुले अचानक गाडीत लॉक झाली
चिराग देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांचे पालक मध्य प्रदेशातील शेतमजूर असून, कामासाठी गुजरातमध्ये राहतात. रविवारी भरत मंदानी हा शेतमालक मुलांच्या पालकांना सोबत घेऊन शेतात कामाला गेला. शेतात जात असताना भरत मंदानी यांनी त्यांची कार शेतमजूरांच्या घराबाहेर उभी केली होती. आई-वडील आणि शेतमालक निघून गेल्यावर सर्व मुले गाडीत घुसली आणि खेळू लागली. यादरम्यान अचानक कारचा दरवाजा बंद झाला आणि गेट लॉक झाले. मुलांना गेट कसे उघडायचे किंवा काच खाली कशी करायची, याची माहिती नव्हती.
गाडीतून बाहेर येण्यासाठी मुलांनी खूप धडपड केली
काही वेळातच गाडीच्या आत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आणि त्यामुळे मुलांचा गुदमरायला लागला. मुलांनी गाडीतून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला, पण बाहेरून कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. वेळेत मदत न मिळाल्याने या मुलांचा गुदमरुन मृत्यू झाला. सायंकाळी कार मालक व या मुलांचे पालक शेतातून घरी परतले असता कारमध्ये मुलांचे मृतदेह आढळून आले. या चार मुलांचे वय दोन ते सात वर्षांच्या दरम्यान आहे.
पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणाची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक तपासानंतर मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी हे प्रकरण अपघाती आहे, मात्र या घटनेमागचे खरे कारण शोधण्यासाठी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.