सापडला अंगठीच्या आकाराचा हायड्रोजनचा वायुमेघ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 04:55 IST2020-01-03T04:55:04+5:302020-01-03T04:55:17+5:30
आकाशगंगेच्या चौपट व्यास; दोन मराठी शास्त्रज्ञांचे संशोधन

सापडला अंगठीच्या आकाराचा हायड्रोजनचा वायुमेघ!
पुणे : राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (एनसीआरए) खगोलशास्त्रज्ञांनी नव्या दीर्घिकेचा (गॅलरी) शोध लावला असून, या दीर्घिकेभोवती हायड्रोजन वायूचा अंगठीच्या आकाराचा गोलाकार वायुमेघ आहे. जायंट मीटरवेव रेडिओ टेलिस्कोप वापरून शास्त्रज्ञांनी हा वायुमेघ शोधला असून, त्याच्या आतील दीर्घिका पृथ्वीपासून २६० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर आहे.
या वायुमेघाचा व्यास आपल्या आकाशगंगेच्या चौपट असून, अशा प्रकारच्या वायुमेघाचा शोध १९८७ मध्ये लागला होता. मात्र, तो पृथ्वीपासून सुमारे १३० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर होता. परंतु एनसीआरएमधील शास्त्रज्ञ ओम्कार बाईत आणि प्रा. योगेश वाडदेकर यांनी आता नव्या दीर्घिकेचा शोध लावला आहे. हे संशोधन मंथली नोटीस रॉयल अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. शास्त्रज्ञांकडून अशा नऊ दीर्घिकांचा अभ्यास केला जाणार आहे.
योगेश वाडदेकर म्हणाले, अशा प्रकारच्या वायुमेघाची निर्मिती नेमकी कशी झाली, हे कोडे आहे. सूर्यमालेशी त्याची तुलना करता येत नाही, कारण वायुमेघाचे वस्तुमान सूर्याच्या दोन अब्जपट आहे. सूर्यमालेचा व्यास काही प्रकाश तास आहे, तर या वायुमेघाचा व्यास ३ लाख ८० हजार प्रकाश वर्ष आहे.
अणुरूपी हायड्रोजन सुमारे २ सेमीच्या तरंगलांबीवर रेडिओ लहरी उत्सर्जित करतो. रेडिओ खगोलशास्त्रज्ञांना हायड्रोजन अणूंच्या किरणोत्सर्गामुळे आपल्या आकाशगंगेमध्ये व जवळील दीर्घिकांमध्ये हायड्रोजन वायूचे प्रमाण व वितरण यांचा नकाशा तयार करता येतो. हायड्रोजनचा मोठा साठा सक्रियपणे तारे निर्माण करणाऱ्या दीर्घिकांमध्ये आढळतो. या नव्या दीर्घिकेमध्ये तारे तयार होण्याची चिन्हे दिसत नाहीत. परंतु, त्यात मोठ्या प्रमाणावर हायड्रोजन दिसत आहे.
खगोलशास्त्रज्ञांपुढे आव्हान
जीएमआरटीच्या निरीक्षणातून हायड्रोजनचा विस्तार मोठ्या आॅफ-सेंटर रिंगच्या स्वरूपात असल्याचे निष्पन्न झाले. त्या रिंगच्या जवळ नवीन तारे असल्याची चिन्हे दिसत नाहीत. एनसीआरएच्या शास्त्रज्ञांनी डुक व कुइयान्द्र या शास्त्रज्ञांच्या सहकार्याने अतिशय संवेदनशील आॅप्टिकल प्रतिमा कॅनडा व फ्रान्स हवाई टेलिस्कोप वापरून मिळविली आहे. या नव्या दीर्र्घिकेमध्ये तारे दिसत नसल्याने हे कसे घडले, हे शोधण्याचे आव्हान खगोलशास्त्रज्ञांपुढे आहे. - ओम्कार बाईत