Harsh Mahajan In BJP: “कार्यकर्ते नाहीत, दिशाहीन-नेतृत्वहीन पक्ष”; ४५ वर्षांची साथ सोडली, काँग्रेसचा बडा नेता भाजपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 21:05 IST2022-09-28T21:03:27+5:302022-09-28T21:05:05+5:30
Harsh Mahajan In BJP: काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने पियुष गोयल आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Harsh Mahajan In BJP: “कार्यकर्ते नाहीत, दिशाहीन-नेतृत्वहीन पक्ष”; ४५ वर्षांची साथ सोडली, काँग्रेसचा बडा नेता भाजपात
नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असतानाच पक्षाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे राजस्थानमध्ये राजकीय संकट ओढावलेले असताना, दुसरीकडे तब्बल ४५ वर्ष पक्षाची सेवा केलेल्या एका बड्या नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष हर्ष महाजन यांनी काँग्रेस पक्षाला मोठा झटका दिला. गेल्या ४५ वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या महाजनांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत हर्ष महाजनांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे दिल्ली दरबारी वजन वाढलेले महाराष्ट्रातील नेते आणि माजी मंत्री विनोद तावडेही यावेळी उपस्थित होते.
पक्षाकडे ना दूरदर्शीपणा राहिलाय ना कार्यकर्ते
मी ४५ वर्षे काँग्रेसमध्ये होतो. आज काँग्रेस दिशाहीन, नेतृत्वहीन झाली आहे. तळागाळातील कार्यकर्ते नाहीत, अशी टीका महाजन यांनी यावेळी बोलताना केली. महाजन हे हिमाचल प्रदेश राज्य सरकारचे माजी मंत्री आहेत. ते माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निकटवर्तीय मानले जात. वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह आता प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत आणि त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह हे पक्षाचे आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये काहीही दम उरला नाही, असेही महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, हर्ष महाजन यांचे स्वागत करताना पियुष गोयल म्हणाले की, महाजन यांनी काँग्रेसमध्ये महत्त्वाची पदे भूषवली असून त्यांनी स्वच्छ प्रतिमा राखली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकांनंतर राज्यात सत्ता टिकवून भाजप इतिहास रचणार असून, भाजप सरकारची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास पियुष गोयल यांनी व्यक्त केला.