Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 14:18 IST2025-10-25T14:18:44+5:302025-10-25T14:18:44+5:30
Punjab Couple Sells Baby for Drugs: ड्रग्ज खरेदी करण्यासाठी पैसे हवेत म्हणून एका महिलेने पोटच्या ५ महिन्याच्या बाळाला ₹१.८ लाख रुपयांना विकले.

Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
पंजाबमधील मानसा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. बुधलाडा उपविभागातील अकबरपूर खुदल गावात ड्रग्जच्या आहारी गेलेल्या एका जोडप्याने आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी चक्क पोटच्या ५ महिन्यांच्या बाळाला ₹१.८ लाख रुपयांना विकले. मुलाच्या मावशीने त्याला परत मिळवण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर हे क्रूर कृत्य उघडकीस आले. या घटनेमुळे बालकांच्या सुरक्षिततेचा आणि ड्रग्जच्या व्यसनाचा सामाजिक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची १९ वर्षीय आई एकेकाळी राज्यस्तरीय कुस्तीगीर होती. मात्र, तिच्या पतीला ड्रग्जचे व्यसन होते आणि त्यामुळे त्यांचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. लग्नाच्या काही दिवसानंतर ती स्वतः देखील व्यसनी बनली. हे जोडपे सोशल मीडियावर भेटले होते, अशी माहिती आहे.
या जोडप्याने बाळाला विकून मिळालेल्या पैशांचा वापर ड्रग्ज खरेदी करण्यासाठी, काही घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी आणि गहाण ठेवलेली मोटारसायकल परत मिळवण्यासाठी केला. गावाच्या सरपंचाच्या पतीने सांगितले की, "आम्ही त्यांना वारंवार त्यांच्या सवयी बदलण्यास सांगितले, परंतु त्यांनी ऐकले नाही."
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी काय म्हणाले?
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हरजिंदर कौर यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, "आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून कळले की, ड्रग्जच्या व्यसनाधीन जोडप्याने सुमारे एक महिन्यापूर्वी बुधलाडा येथील एका कुटुंबाला त्यांचे मूल विकले. दोन्ही कुटुंबांनी एका कागदपत्रावर स्वाक्षरी केली, ज्याला त्यांनी दत्तक पत्र म्हटले आहे." अधिक माहिती गोळा करण्यासाठी त्यांचे पथक तपास करत आहे.
मुलाला आई-वडिलांकडे सोपवणे योग्य नाही
डीसीपीओ हरजिंदर कौर यांनी जोडप्याची सध्याची व्यसनाधीन आणि अत्यंत हलाखीची परिस्थिती पाहता, मुलाला तातडीने त्यांच्याकडे परत करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, "मुलाला दत्तक कुटुंबाकडे ठेवायचे की आमच्या ताब्यात घ्यायचे, याचा अंतिम निर्णय उच्च अधिकारी घेतील. सध्या आमच्याकडे अशा मुलांच्या काळजीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत."