मणिपूरमध्ये स्फोटात माजी आमदाराची पत्नी ठार; घराजवळील कचऱ्यात ठेवला होता बॉम्ब
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 12:48 IST2024-08-12T12:46:55+5:302024-08-12T12:48:22+5:30
गोळीबारात ४ ठार; जाळले नेत्याचे घर

मणिपूरमध्ये स्फोटात माजी आमदाराची पत्नी ठार; घराजवळील कचऱ्यात ठेवला होता बॉम्ब
इंफाळ: मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात अतिरेकी व एका स्थानिक समुदायातील ग्रामीण स्वयंसेवकांमध्ये उडालेल्या चकमकीत ४ जण ठार झाले. मृतांमध्ये अतिरेकी गटाच्या एका सदस्याचा, तर ३ स्वयंसेवकांचा समावेश आहे. त्यानंतर शनिवारी सायंकाळी कांगपोकपी जिल्ह्यात माजी आमदाराच्या घरात झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात त्यांची पत्नी ठार झाली. गोळीबारानंतर समुदायाच्या ग्रामीण सदस्यांनी यूकेएलएफच्या एका स्वयंघोषित नेत्याच्या घराला आग लावली.
आमदार बचावले
सैकुल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यमथोंग हाओकिप यांच्या घरानजीकच्या एका घरात शनिवारी शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. यात हाओकिप यांची दुसरी पत्नी चारुबाला जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बॉम्बस्फोटावेळी हाओकिप घरातच होते, सुदैवाने ते बालंबाल बचावले आहेत. हाओकिप हे २०१२ ते २०१७ या दरम्यान २ वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले होते. २०२२ मधील निवडणुकीपूर्वी हाओकिप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
घराजवळील कचऱ्यात ठेवला होता बॉम्ब
माजी आमदाराच्या घराजवळील कचऱ्यात आयईडी बॉम्ब ठेवला होता. आमदाराच्या पत्नीने हा कचरा जाळल्यानंतर आयईडीचा शक्तिशाली स्फोट झाल्याच्या दावा पोलिसांनी केला आहे.