Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी जम्मू-काश्मीर, गोवा आणि मेघालय सारख्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून काम केले होते.
मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. कॉलेज शिक्षणापासूनच राजकारणातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे सत्यपाल मलिक हे समाजवादी विचारसरणीचे नेते होते. खासदार ते राज्यपाल असा प्रवास करणारे सत्यपाल मलिक गेल्या काही वर्षांत भाजपशी संबंधित होते. त्यांनी अनेक वर्षे राज्यपाल म्हणून काम केले. गेल्या काही वर्षांपासून ते सरकारविरुद्ध आरोप करत होते. यामुळे ते चर्चेत आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते.
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्याच सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स खात्यावरुन दिली आहे. या एक्स-अकाउंटवरूनच शेवटचे ९ जुलै रोजी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली होती. त्यांनी भाजपा सरकारवर टीका केली होती. यांनी शेतकरी चळवळीच्या समर्थनार्थ अनेक राज्यांचा दौरा केला होता आणि सरकारला तीन वादग्रस्त विधेयके मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.