...तोपर्यंत रामलल्लाचं दर्शन करू देणार नाही; बृजभूषण सिंह यांची राज ठाकरेंना पुन्हा धमकी
By प्रविण मरगळे | Updated: March 30, 2025 11:27 IST2025-03-30T11:26:15+5:302025-03-30T11:27:53+5:30
महाराष्ट्राच्या भूमीवर आमच्या शिक्षित बांधवांना आणि गरीबांना मारण्याचं काम केले, तुम्ही उत्तर भारतीयांना कचरा समजता का असा सवाल बृजभूषण सिंह यांनी विचारला.

...तोपर्यंत रामलल्लाचं दर्शन करू देणार नाही; बृजभूषण सिंह यांची राज ठाकरेंना पुन्हा धमकी
कैसरगंज - भाजपाचे माजी खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांना रामलल्लाचं दर्शन करून देणार नाही असं विधान माजी खासदार बृजभूषण सिंह यांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते. बृजभूषण सिंह यांचं विधान सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
उन्नाव येथे भाजपा खासदार साक्षी महाराज यांच्या होळी मिलन कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना इशारा देत म्हटलं की, मला आठवतं, जेव्हा जेव्हा राज ठाकरे उत्तर भारतीयांना मारहाण करायचा तेव्हा तेव्हा काँग्रेस पक्ष त्यांना सुरक्षा द्यायचा. आमचे उत्तर भारतीय तिथं मजुरी करायला जायचे, कुठे काम करायला जायचे, मुलाखतीला जायचे, गरीब लोकांना मारहाण करायचं काम केले जायचे आणि काँग्रेस सरकार त्यांना सुरक्षा देत होते असं त्यांनी म्हटलं.
त्यामुळे जेव्हा राज ठाकरेंनी अयोध्या दर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना रामलल्लाचं दर्शन घ्यायचे होते. अयोध्या सगळ्यांची आहे. आमचीही आहे. प्रत्येक गरीबाची आहे. राज ठाकरे यांचीही आहे. आज तिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून, देशा बाहेरूनही लोक दर्शनाला येतात. कुठेही कुणाचा विरोध नाही. परंतु मी राज ठाकरेंना विरोध केला. काही मागितले नाही फक्त माफी मागा म्हटलं. महाराष्ट्राच्या भूमीवर आमच्या शिक्षित बांधवांना आणि गरीबांना मारण्याचं काम केले, तुम्ही उत्तर भारतीयांना कचरा समजता का असा सवाल बृजभूषण सिंह यांनी विचारला.
दरम्यान, तुम्ही अयोध्येला या, परंतु जोपर्यंत इथला गरीब, महिला, युवकांसमोर तुम्ही जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही रामलल्लाचं दर्शन करू देणार नाही याचा पुनरूच्चार बृजभूषण सिंह यांनी केला. याधीही २०२२ मध्ये राज ठाकरे यांनी अयोध्या जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी बृजभूषण सिंह यांना त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा टाळला होता.