अखेरचा निरोप! शहीद मुलाला शेवटचे पाहण्यासाठी वृद्ध आई-वडिलांची ४ किमी पायपीट, यंत्रणेचे क्रूर वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 09:07 IST2026-01-21T09:06:57+5:302026-01-21T09:07:40+5:30
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कापकोट येथील बेठी येथील हवालदार गजेंद्र सिंह गढिया शहीद झाले.

अखेरचा निरोप! शहीद मुलाला शेवटचे पाहण्यासाठी वृद्ध आई-वडिलांची ४ किमी पायपीट, यंत्रणेचे क्रूर वास्तव
Martyred Gajendra Singh: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये 'ऑपरेशन त्राशी-I' दरम्यान दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले हवालदार गजेंद्र सिंह गढिया यांच्यावर मंगळवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यांना निरोप देताना शहीद गजेंद्र यांच्या कुटुंबियांचा संघर्ष आणि दु:ख पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या सुपुत्राच्या अंत्यदर्शनासाठी त्याच्या वृद्ध आई-वडिलांना चक्क ४ किलोमीटर डोंगरदऱ्यातून पायपीट करावी लागली.
गावापर्यंत रस्ता नाही, म्हणून मैदानावरच घेतले दर्शन
हवालदार गजेंद्र सिंह हे उत्तराखंडमधील कपकोटमधील बीथी पन्याती या दुर्गम गावचे रहिवासी होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही या शहीद जवानाच्या गावापर्यंत पक्का रस्ता पोहोचलेला नाही. रस्ता नसल्यामुळे त्यांचे पार्थिव गावापर्यंत नेणे अशक्य होते. अखेर कपकोट पदवी महाविद्यालयाच्या मैदानावर पार्थिव आणण्यात आले. आपल्या वीर पुत्राला शेवटचे पाहण्यासाठी ८० वर्षांच्या उंबरठ्यावर असलेल्या आई चंद्रावती देवी आणि वडील धन सिंह यांना ४ किलोमीटरची खडतर पायपीट करावी लागली आणि त्यानंतर १३ किलोमीटर गाडीने प्रवास करून ते त्याच्यापर्यंत पोहोचले.
कुटुंबाचा एकमेव आधार हरपला
४३ वर्षीय गजेंद्र सिंह हे भारतीय सैन्याच्या 'टू-पैरा' कमांडो युनिटमध्ये तैनात होते. ते आपल्या कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यांचे वृद्ध आई-वडील शेती करून उदरनिर्वाह करतात, तर धाकटा भाऊ एका खासगी शाळेत कमी पगारावर शिक्षक आहे. गजेंद्र यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक आणि मानसिक कणाच मोडला आहे.
पत्नी आणि चिमुरड्या मुलांचा आक्रोश
गजेंद्र यांची पत्नी लीला गढिया आपल्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी डेहराडूनमध्ये भाड्याच्या खोलीत राहतात. दोन्ही मुले चौथीच्या वर्गात शिकत आहेत. हेलिकॉप्टरने पतीचे पार्थिव आल्यापासून लीला वारंवार बेशुद्ध पडत होत्या, तर पप्पा कधी उठणार? असा प्रश्न विचारणाऱ्या चिमुरड्या मुलांच्या रडण्याने उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले.
गावाची व्यथा कायम
शहीद गजेंद्र यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा डोंगरदऱ्यातील विकासकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माजी सरपंचांनी सांगितले की, रस्ता नसल्यामुळे आजही गरोदर स्त्रिया आणि रुग्णांना डोलीत घालून न्यावे लागते. देशासाठी शहीद होणाऱ्या जवानाच्या आई-वडिलांनाही शेवटच्या वेळी आपल्या मुलाला पाहण्यासाठी संघर्ष करावा लागल्याची शोकांतिका असल्याचे गावकऱ्यांनी व्यक्त केले.
लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
सरयू आणि खीरगंगा नद्यांच्या संगमावर हवालदार गजेंद्र सिंह गढिया यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 'भारत माता की जय' आणि 'शहीद गजेंद्र सिंह अमर रहे' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.