१९८८ नंतर प्रथमच देशात बनणार प्रवासी विमान; 'उडान' योजनेला गती, पुतीन यांच्या भारत भेटीआधी करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:12 IST2025-10-29T11:12:08+5:302025-10-29T11:12:32+5:30
भारतीय हवाई क्षेत्रातील मैलाचा दगड

१९८८ नंतर प्रथमच देशात बनणार प्रवासी विमान; 'उडान' योजनेला गती, पुतीन यांच्या भारत भेटीआधी करार
नवी दिल्ली: लहान अंतरावरच्या उड्डाणांसाठी दोन इंजिन असलेले 'एसजे-१००' जातीचे प्रवासी विमान आता रशियाच्या मदतीने भारतात तयार होणार आहे. या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण करार सोमवारी मॉस्कोमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड व युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांच्यात झाला आहे. या करारामुळे कमी अंतरावरील शहरे विमान सेवेने जोडणाऱ्या 'उडान' योजनेला गती मिळणार आहे. तसेच भारतातच लहान प्रवासी विमानांचे उत्पादन होणार आहे. त्यामुळे नवे रोजगार निर्माण होऊन आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास एचएएलने व्यक्त केला आहे. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हा करार भारतीय हवाई क्षेत्रातील मैलाचा दगड असल्याची प्रतिक्रिया दिली आहे
याआधी कोणती विमाननिर्मिती: १९६१ मध्ये एचएएलने 'एव्हीआरओ एचएस-७४८' जातीच्या विमानांची निर्मिती केली होती. पण ही विमाने केवळ भारतीय हवाई दलाकडून वापरली जात होती. या विमानांचे उत्पादन १९८८ मध्ये थांबवण्यात आले होते.
काय फायदा होणार?
या घडीला १६ विमान कंपन्यांकडून 'एसजे-१००' जातीची २०० प्रवासी विमाने चालवली जात आहेत. आता भारत स्वतःच्या मागणीनुसार विमानांची निर्मिती करेल. येत्या १० वर्षांत 3 देशांतर्गत प्रवासासाठी २०० विमानांची तर हिंदी महासागर प्रदेशातील देशांना हवाई सेवा देण्यासाठी ३५० विमानांची गरज लागणार आहे. ही गरज त्याने पूर्ण होईल.