BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 23:22 IST2025-10-23T23:21:28+5:302025-10-23T23:22:34+5:30
बीएसएफचे महासंचालक दलजित सिंग चौधरी यांनी गुरुवारी युवा बीएसएफ कर्मचाऱ्यांना आउट-ऑफ-टर्न पदोन्नती प्रदान केली

BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
नवी दिल्ली - सीमा सुरक्षा दल(BSF)च्या सहा दशकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका युवा महिला कॉन्स्टेबलला अवघ्या ५ महिन्यात पदोन्नती मिळाली आहे. ही अशी घटना आहे जी भारतातील कुठल्याही सशस्त्र पोलीस दलात कधी पाहायला मिळाली नाही. उत्तर प्रदेशच्या दादरी शहरात राहणारी, सुतार काम करणाऱ्या व्यक्तीची मुलगी शिवानीने बीएसएफमध्ये इतक्या वेगाने ओळख मिळवणारी पहिली महिला कॉन्स्टेबल म्हणून इतिहासात आपले नाव कोरले आहे.
बीएसएफची स्थापना १९६५ मध्ये झाली आणि त्यात अंदाजे २,६५,००० जवान कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक काम पश्चिमेला पाकिस्तान आणि पूर्वेला बांगलादेशशी असलेल्या भारताच्या सीमांचे रक्षण करणे तसेच देशाच्या अंतर्गत सुरक्षा क्षेत्रात विविध कर्तव्ये पार पाडणे आहे. ANI नुसार, भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात सेवा देणारी शिवानी ही तिच्या कुटुंबातील पहिली सदस्य आहे. ती गेल्या काही वर्षांत अपवादात्मक कामगिरीसाठी अचानक बढती मिळवणारी दुसरी बीएसएफ कॉन्स्टेबल ठरली आहे. ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५ दरम्यान ब्राझीलमध्ये झालेल्या १७ व्या जागतिक वुशु चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकण्याच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर तिला हेड कॉन्स्टेबल पदावर बढती देण्यात आली आहे.
BSF चे महासंचालक दलजित सिंग चौधरी यांनी केला सन्मान
बीएसएफचे महासंचालक दलजित सिंग चौधरी यांनी गुरुवारी युवा बीएसएफ कर्मचाऱ्यांना आउट-ऑफ-टर्न पदोन्नती प्रदान केली. महासंचालक चौधरी यांनी सलग दुसऱ्या वर्षी युवा बीएसएफ खेळाडूंना उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय कामगिरीसाठी आउट-ऑफ-टर्न पदोन्नती देऊन सन्मानित केले आहे, जे प्रतिभेचे संगोपन आणि उत्कृष्टतेची ओळख पटवण्याच्या दलाच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. १८ जुलै २०२५ रोजी चौधरी यांनी बीएसएफ कॉन्स्टेबल अनुज (सेंट्रल वुशु टीम) यांना हेड कॉन्स्टेबल पदावर पदोन्नती देऊन सन्मानित केले, हा सन्मान २१ वर्षांनंतर मिळाला होता. चीनमधील जियांगयिन येथे झालेल्या १० व्या सांडा वर्ल्ड कपमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडू म्हणून त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अनुजला ही पदोन्नती देण्यात आली.
Honour for BSF Sportspersons!
— BSF (@BSF_India) October 23, 2025
Making history, Constable Shivani of BSF, the Silver medalist🥈 in the 17th World Wushu Championship 2025, has been promoted to the Rank of Head Constable today.
The Rank ceremony was graced by DG BSF Shri Daljit Singh Chawdhary.
Notably, this… pic.twitter.com/sSeKGNVq1T
सप्टेंबर २०२५ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत जिंकले रौप्य पदक
पंजाबच्या १५५ व्या बटालियनमधील शिवानीने सांगितले की, सप्टेंबरमध्ये झालेल्या २०२५ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मी रौप्य पदक जिंकले. या कामगिरीमुळे मला आज हेड कॉन्स्टेबल पदावर बढती मिळाली आहे. मी पाच महिन्यांपासून सेवेत आहे. मी १ जून २०२५ रोजी रुजू झाले होते. मी सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास सराव करते. माझे पुढचे ध्येय विश्वचषक आहे आणि त्यासाठी मी कठोर परिश्रम करेन. मी तिथे सुवर्णपदक जिंकण्याचा प्रयत्न करेन असं तिने सांगितले.
आउट-ऑफ-टर्न बढती म्हणजे काय?
दरम्यान, आउट-ऑफ-टर्न बढती हा "दुर्मिळ सन्मान" मानला जातो आणि इतर कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी एक शक्तिशाली प्रोत्साहन मानले जाते. अशा बढती "अपवादात्मक चांगल्या कामासाठी" दिल्या जातात आणि सैन्याच्या इतिहासातील प्रत्येक वैयक्तिक बढतीच्या नोंदी सार्वजनिकरित्या उपलब्ध नाहीत.