Navratri: ७५ वर्षांनंतर प्रथमच LOCवरील जागृत मंदिरात झाली नवरात्रौत्सवाची पूजा, भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 20:48 IST2023-10-16T20:47:40+5:302023-10-16T20:48:19+5:30
Navratri 2023: देशभरात सध्या नवरात्रौत्सव उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान, आज नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एलओसी टीटवाल काश्मीरमधील नवनिर्मित शारदा मंदिरामध्ये शरद नवरात्रौत्सवाचं आयोजन करण्यात आलं.

Navratri: ७५ वर्षांनंतर प्रथमच LOCवरील जागृत मंदिरात झाली नवरात्रौत्सवाची पूजा, भाविकांची गर्दी
देशभरात सध्या नवरात्रौत्सव उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान, आज नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एलओसी टीटवाल काश्मीरमधील नवनिर्मित शारदा मंदिरामध्ये शरद नवरात्रौत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या नवरात्रौत्सवामध्ये देशभरातील अनेक भाविकांनी सहभाग घेतला होता. १९४७ मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर गेल्या ७५ वर्षांत प्रथमच इथे नवरात्रौत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
हंपी येथील स्वामी गोविंदानंद सरस्वती हे त्यांच्या काही अनुयायांसह कर्नाटकमधील किष्किंधा येथून रथयात्रा करत इथे पोहोचले आहेत. तसेच काही काश्मिरी पंडित तीर्थयात्रीही इथे उपस्थित होते. देशाच्या फाळणीनंतर नियंत्रण रेषेवर असलेल्या शारदा मंदिरामध्ये नवरात्रौत्सवाची पूजा करणं पुन्हा एकदा ऐतिहासिक क्षण होता. येथे मंदिर आणि गुरुद्वारा होता. ते १९४७ मध्ये हल्ला करणाऱ्या घुसखोरांनी जाळून टाकलं होतं. आता त्याच जमिनीवर एक नवं मंदिर आणि गुरुद्वारा बांधण्यात आला आहे. त्याचं उदघाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर्षी २३ मार्च रोजी केलं होतं.
दरम्यान, इथे साजऱ्या झालेल्या नवरात्रौत्सवाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही समाधान व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितलं की, १९४७ नंतर प्रथमत यावर्षी काश्मीरमधील ऐतिहासिक शारदा मंदिरामध्ये नवरात्रौत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, ही गहन आध्यात्मिक महत्त्वाची बाब आहे. ही घटना केवळ काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता पुनर्प्रस्थापित झाल्याचं प्रतीकच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ज्योत पुन्हा प्रज्ज्वलित करण्याचं प्रतीक आहे, असे अमित शाह म्हणाले.