बोअरवेलमध्ये पडला पाच वर्षांचा मुलगा, २२ तासांनंतरही बाहेर काढण्यात अपयश, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 19:08 IST2024-12-10T19:08:03+5:302024-12-10T19:08:54+5:30
Rajasthan News: राजस्थानमधील दौसा येथे एक लहान मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली आहे. आर्यन नावाचा हा मुलगा शेतात खेळत असताना उघड्या बोअरवेलमध्ये पडला आणि मध्ये जाऊन अडकला.

बोअरवेलमध्ये पडला पाच वर्षांचा मुलगा, २२ तासांनंतरही बाहेर काढण्यात अपयश, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
राजस्थानमधील दौसा येथे एक लहान मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली आहे. आर्यन नावाचा हा मुलगा शेतात खेळत असताना उघड्या बोअरवेलमध्ये पडला आणि मध्ये जाऊन अडकला. दौसा जिल्ह्यामधील कालीखाड गावात ही घटना घडली आहे. येथील आर्यन मीणा नावाचा मुलगा आई गुड्डीदेवीसोबत सोमवारी दुपारी शेतात जात होता. वाटेतूवन खेळत खेळत जात असताना बोअरवेलजवळ त्याचा पाय घसरला आणि तो १५० फूट बोअरवेलमध्ये पडला. बोअरवेलमध्ये मुलगा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली.
दुर्घटनेची माहिती मिळताच दौसाचे जिल्हाधिकारी देवेंद्र कुमार, आमदार दीनदयाल बेरवा यांच्यासह पोलीस आणि प्रशासनामधील बरेचसे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्याबरोबरच एनडीआरएफच्या पथकालाही मदतीसाठी बोलावण्यात आले. बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी बोअरवेलच्या बाजूला समांतर खड्डा खोदण्यात येत आहे. सोबतच मुलाला बोअरवेलमधून थेट बाहेर काढण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. मात्र २४ तास लोटत आले तरी या मुलाला बाहेर काढता आलेलं नाही.
मिळत असलेल्या माहितीनुसार मदतकार्यात गुंतलेल्या लोकांनी सांगितले की, आम्ही ही घटना घडल्यानंतर १३ तासांनंतर रात्री २ वाजण्याच्या सुमारास कॅमेऱ्याच्या माध्यमातून हालचाल पाहिली होती. आता बचाव दलाकडून त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक समांतर बोअरवेल खोदण्यात येत आहे. तसेच अडकलेल्या मुलाला पाईपच्या साथीने ऑक्सिजन पुरवला जात आहे. तसेच दोरी आणि इतर उपकरणांच्या साथीने त्याच्यापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तसेच इतर काही उपकरणांच्या मदतीने मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
समांतर खड्डा खोदण्यासाठी अनेक अर्थमुव्हर्स आणि ट्रॅक्टरची मदत घेतली जात आहे. कालीखाड गावातील एका शेतात खेळत असताना आर्यन उघड्या बोअरवेलमध्ये पडला होता. ही घटना दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली होती.