पहिल्याच अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 21:15 IST2019-06-18T21:14:22+5:302019-06-18T21:15:58+5:30
अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

पहिल्याच अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी
नवी दिल्ली - नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतरचे संसदेचे पहिलेच अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. दरम्यान, बिहारमध्ये चमकी आजाराने झालेले लहान मुलांचे मृत्यू आणि जम्मू काश्मीरमध्ये दररोज होत असलेले दहशतवादी हल्ले यावरून पहिल्याच अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज संध्याकाळी बोलावलेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
केंद्रात पुन्हा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला घेरण्यासाठी कोणती रणनीती आखता येईल यासंदर्भात चर्चा करण्यासाठी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत चर्चा करण्यात आली. आता बुधवारी सकाळी पुन्हा एखदा यूपीएची बैठक बोलावली असून, त्यावेळी सर्वपक्षीय बैठकीत जाण्याबाबत निर्णय होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक देश एक निवडणुकीसाठी मोदींकडून विचाराधीन असलेल्या प्रस्तावाला विरोधी पक्षांकडून विरोध होऊ शकतो.
दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएचे उमेदवरा ओम बिर्ला यांना समर्थन देण्याबाबत विरोधकांमध्ये एकमत झाले आहे. आज झालेल्या या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, डीएमके नेत्या कनिमोझी, सीपीआय नेते डी. राजा आणि नॅशनल काँन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.