'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 08:42 IST2025-11-15T08:41:14+5:302025-11-15T08:42:30+5:30
Bihar Assembly Election 2025 Result: भाजपने सर्वाधिक जागांवर आघाडी घेऊनही त्यांच्या मतांची टक्केवारी राजदपेक्षा कमी आहे. ही किमया आपल्या निवडणूक पद्धतीची आहे.

'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
पाटणा - भाजपने सर्वाधिक जागांवर आघाडी घेऊनही त्यांच्या मतांची टक्केवारी राजदपेक्षा कमी आहे. ही किमया आपल्या निवडणूक पद्धतीची आहे. भाजपला २०.९० टक्के मते मिळाली आहेत. तर राजदची मतांची टक्केवारी २२.७६ टक्के आहे. भाजपला सुमारे टक्के कमी आहेत. दुसऱ्या क्रमांकावरच्या जदयूची टक्केवारी १८.९२ टक्के इतकी आहे. जी राजदच्या तुलनेत सुमारे चार टक्क्याने कमी आहे.
सर्वाधिक मते असतील तो विजयी, टक्केवारी नाही
भारतामध्ये 'फर्स्ट पास्ट द पोस्ट' अशी निवडणूक पद्धती आहे. या पद्धतीनुसार एखाद्या पक्षाला सर्वाधिक मते मिळाली म्हणजे तो सत्तेवर येतो असे नाही तर ज्या मतदारसंघात एखाद्या पक्षाचा उमेदवार सर्वाधिक मताने निवडून येतो तो विजयी घोषित होतो. अगदी त्या उमेदवाराला ५० टक्क्यापेक्षा कमी मते मिळाली तरी तो विजयी ठरू शकतो.
बिहार निवडणुकांत राजदला भाजपपेक्षा जास्त मते मिळाली असली तरी राजदच्या उमेदवाराला अनेक मतदारसंघात भाजप, जदयूच्या उमेदवारापेक्षा कमी मते पडली आहेत. त्यामुळे त्यांना कमी जागा मिळाल्या आहेत. तर भाजप जास्त आघाडीवर आहे कारण त्यांनी अनेक मतदारसंघात थोड्या-बहुत फरकाने राजद, काँग्रेसपेक्षा अधिक मते मिळवली आहेत. तसेच जदयूचेही आहे.

‘नोटा’ पर्यायाचे प्रमाण किंचित वाढले
नवी दिल्ली : यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये ‘नोटा’चा (नन ऑफ दी अबॉव्ह) पर्याय निवडणाऱ्यांचे प्रमाण १.८१ टक्के म्हणजे ६,६५,८७० मते इतके होते. हे मागील विधानसभा निवडणुकांपेक्षा अधिक आहे. पण २०१५ सालच्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत कमी आहे.
