आधी मनीष तिवारी, आता शशी थरुर; प्रियंका गांधींनी दूर केली या दिग्गज नेत्यांची नाराजी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:35 IST2025-08-21T13:34:54+5:302025-08-21T13:35:41+5:30
काँग्रेस खासदार मनीष तिवारी आणि खासदार शशी थरुर हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.

आधी मनीष तिवारी, आता शशी थरुर; प्रियंका गांधींनी दूर केली या दिग्गज नेत्यांची नाराजी?
Congress: मनीष तिवारी आणि शशी थरुर हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये गणले जातात. तिवारी हे चंदीगडचे खासदार आहेत, तर थरूर केरळच्या तिरुवनंतपुरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.या दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली आहे. मात्र, काही काळापासून दोघेही पक्षाच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत.
ऑपरेशन सिंदूरवर देशाचे बाजू मांडण्यासाठी परदेशात गेलेल्या खासदारांमध्ये तिवारी आणि थरुर यांचाही समावेश होता. पण, संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची वेळ आली, तेव्हा काँग्रेसने या दोन्ही नेत्यांना बोलण्याची संधी दिली नाही. त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. मात्र, अलिकडेच पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दोन्ही नेत्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर प्रियांकांनी दोघांची नाराजी दूर केली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आधी तिवारी, नंतर थरूर यांची भेट
वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी राजकीयदृष्ट्या खूप सक्रिय आहेत. त्या लोकसभेत सरकारवर सातत्याने हल्लाबोल करतात. ऑपरेशन सिंदूरवरील भाषणात तर त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. याशिवाय, त्या पक्षातील नाराज नेत्यांची समजूनत काढताना दिसत आहेत. २९ जुलै रोजी मनीष तिवारी आणि प्रियंका यांच्या भेटीचा व्हिडिओ समोर आला होता, तर आता शशी थरुर यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे.
प्रियांका आणि मनीष तिवारी यांची भेट संसदेच्या आवारात झाली. प्रियांका संसदेच्या आत जात असताना, त्या तिवारी यांना भेटताना दिसल्या. दोघांमध्ये काही सेकंदाची चर्चाही झाली. तर, बुधवारी थरुर यांना भेटतानाचा फोटो समोर आला. फोटो पाहता असे दिसते की, दोघांची ही भेट संसद भवनातील आहे. त्यांच्यासोबत इतर काही नेतेही दिसत आहेत. यावरुनच प्रियंका गांधींनी दोन्ही नेत्यांची नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे.
तिवारी संसदेत बोलू इच्छित होते!
मनीष तिवारी ऑपरेशन सिंदूरवर संसदेत बोलू इच्छित होते. त्यांनी पक्षाला एक पत्रही लिहिले होते, ज्यामध्ये चर्चेत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु पक्षाने त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. काँग्रेसने लोकसभेतील पक्षाचे नेते गौरव गोगोई आणि खासदार कोडिकुनिल सुरेश यांच्यामार्फत थरुर यांच्याशी संपर्क साधला होता, परंतु त्यांनी नकार दिला आणि त्याऐवजी भारतीय बंदरे विधेयक, २०२५ वर बोलण्याची इच्छा व्यक्त केली.
पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
शशी थरुर यांना बोलण्याची संधी न दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. लोकसभेत थरूर यांचे नाव न घेता ते म्हणाले की, आपले शिष्टमंडळ परदेशात भारताची बाजू जोरदारपणे मांडत होते, परंतु काही वरिष्ठ काँग्रेस नेते यामुळे दुखावले आहेत. हेच कारण आहे की, काही काँग्रेस नेत्यांना सभागृहात बोलू दिले गेले नाही.