"आधी यमुनेचे पाणी पिऊन दाखवा, मग मी रुग्णालयात भेटेन", राहुल गांधींनी कुणाला दिलं खुलं चॅलेन्ज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 19:15 IST2025-01-29T19:15:14+5:302025-01-29T19:15:54+5:30
याच वेळी पंतप्रधान मोदी आणि आरएसएसने द्वेष पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोपही त्यांनी केला...

"आधी यमुनेचे पाणी पिऊन दाखवा, मग मी रुग्णालयात भेटेन", राहुल गांधींनी कुणाला दिलं खुलं चॅलेन्ज?
सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बवाना येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपसह आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांनाही निशाण्यावर घेतले. त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. येथे घाणेरडे पाणी मिळते. महागडे पाणी विकत घ्यावे लागते, असे राहुल गांधी म्हणाले. याच वेळी पंतप्रधान मोदी आणि आरएसएसने द्वेष पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, "ते जिथे जातात तिथे धर्माविरुद्ध धर्म, जातीविरुद्ध जाती आणि भाषा विरुद्ध भाषा, असा वाद निर्माण करतात. केंद्रातील मोदी सरकारवर आरोप करताना राहुल म्हणाले, पूर्वी सार्वजनिक क्षेत्र असायचे. गरीबांसाठी जागा असायच्या. रोजगार मिळत होता. सर्व थांबले. खाजगीकरण झाले. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे छोटे दुकानदार आणि छोटे व्यवसाय बंद पडले. भारतातील तरुणांना रोजगार मिळू शकत नाही. मोदी आणि केजरीवाल सरकारच्या काळात रोजगार मिळू शकत नाही."
केजरीवाल यांच्यावर आरोप करताना राहुल म्हणाले, "केजरीवाल लांबलचक भाषणे देतात. ते पूर्वी लहान गाडीने फिरायचे. विजेच्या खांबावर चढायचे. मी स्वच्छ राजकारण आणेन, असे ते म्हणाले होते. त्यानंतर दिल्लीत सर्वात मोठा दारू घोटाळा झाला. त्यांच्या पक्षाने आणि त्यांच्या लोकांनी तो केला. ते पाच वर्षांपूर्वी म्हणाले होते, यमुनेत स्नान करतील आणि पाणी पितील. पाच वर्षे झाली. आजपर्यंत केजरीवाल यांनी यमुनेचे पाणी प्यालेले नाही. आपल्याला घाणेरडे पाणी प्यावे लागते. केजरीवाल मात्र, शीशमहालात राहतात. स्वच्छ पाणी पितात आणि तुम्हाला खोटी आश्वासनं देतात.
"आपण रोजगार आणि प्रगतीसंदर्भात बोलतो. शीलाजींच्या काळात रस्ते बांधले गेले, विकास झाला, आम्ही खोटी आश्वासने देत नव्हतो. केजरीवाल आणि मोदी दोघेही २४ तास खोटी आश्वासने देतात. केजरीवाल म्हणाले होते, यमुनेचे पाणी पितील. मी केजरीवाल यांना आव्हान देतो की, आपण आज जाऊन यमुनेचे पाणी प्या. त्यानंतर मी तुम्हाला रुग्णालयात येऊन भेटेन," असेही राहुल गांधी म्हणाले.