युद्धात गनिमी कावा! स्ट्रेट होर्मुझमधून मृत्यूला चकवा देत पहिला तेल टँकर सुरक्षित मुंबईत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:34 IST2026-03-12T11:42:05+5:302026-03-12T12:34:21+5:30
शेनलॉन्ग सुएझमॅक्स हे जहाज १ मार्च रोजी सौदी अरेबियातील रास तनुरा बंदराहून तेल भरून ३ मार्चला तिथून निघाले होते.

युद्धात गनिमी कावा! स्ट्रेट होर्मुझमधून मृत्यूला चकवा देत पहिला तेल टँकर सुरक्षित मुंबईत दाखल
मुंबई - अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ या सामुद्रधुनी मार्गे तेलाने भरलेला पहिला टँकर भारतात पोहचला आहे. सौदी अरेबियातून कच्चे तेल घेऊन आलेला हा टँकर मुंबई पोर्टवर पोहचला आहे. युद्धभूमीतून सुरक्षितपणे भारतात पोहचणारा हा पहिला टँकर आहे. अमेरिकाइस्रायलने इराणवर हवाई हल्ले केले. त्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आक्रमक इराणने आखाती देशांवर हल्ले केले. या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील सागरी वाहतूक ठप्प झाली होती.
लायबेरियाचा झेंडा असलेल्या शेनलॉन्ग सुएझमॅक्स या जहाजाने १ मार्च रोजी सौदीच्या रास तनुरा बंदरातून कच्चे तेल भरले आणि दोन दिवसांनी तिथून निघाले. सागरी डेटा फर्म लॉयड्स लिस्ट इंटेलिजेंस आणि टँकरट्रॅकर्सच्या मते या जहाजाचे शेवटचे सिग्नल स्थान ८ मार्च रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीत होते. हे जहाज अशावेळी भारतात पोहचले आहे जेव्हा इराणने अनेक मर्चेंट शिपवर हल्ले केलेत. चीनला जाणाऱ्या जहाजांशिवाय इतर कुठल्याही जहाजांना या सामुद्रधुनीमार्गे वाहतूक करण्यावर इराणने बंदी घातली होती. हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. जगातील अनेक देशात याच सागरी मार्गाने तेलाची प्रचंड वाहतूक होत असते.
अत्यंत सतर्कतेने हे जहाज मुंबईला पोहचले
या जहाजाशी निगडित एका व्यक्तीने सांगितले की, मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या या जहाजाने अत्यंत सतर्कतेने प्रवास केला. स्ट्रेट होर्मुझसारख्या धोकादायक मार्गावर प्रवास करताना ट्रॅकिंग होऊ नये म्हणून जहाजाने त्याचे ट्रान्सपॉन्डर आणि AIS (ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम) बंद केले होते. त्यामुळे त्याचा माग काढणे अशक्य झाले. हे जहाज बुधवारी दुपारी १ वाजता मुंबई पोर्टवर पोहचले आणि संध्याकाळी ६.०६ वाजता ते रिकामे करण्यात आले.
दरम्यान, शेनलॉन्ग हे जहाज १,३५,३३५ मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन आले आहे. ते जवाहर नेहरू पोर्टवर थांबवण्यात आले. यातून कच्चे तेल उतरवण्यास सुरुवात झाली आहे. हे कच्चे तेल पूर्व मुंबईतील माहुल येथील रिफायनरीजसाठी पाठवले जाईल अशी माहिती मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अधिकारी प्रवीण सिंह यांनी दिली आहे.
गनिमी काव्याचा वापर
शेनलॉन्ग सुएझमॅक्स हे जहाज १ मार्च रोजी सौदी अरेबियातील रास तनुरा बंदराहून तेल भरून ३ मार्चला तिथून निघाले होते. ८ मार्चला त्याचे शेवटचे लोकेशन होर्मुझची सामुद्रधुनी होती. त्यानंतर अचानक हे जहाज रडारवरून गायब झाले. सूत्रांनुसार, या खतरनाक क्षेत्रातून प्रवास करताना जहाजाने वेळ आणि ट्रॅकिंग लपवण्यासाठी जहाजातील ट्रांसपोंडर आणि AIS सिस्टम बंद केली होती. अत्यंत शिताफीने गनिमी काव्याचा वापर करून हे जहाज पुन्हा ९ मार्च रोजी ट्रॅकिंग डेटाबेसवर पुन्हा दिसले. अखेर ११ मार्चला हे जहाज सुरक्षितपणे मुंबईला पोहचले. या जहाजाचे कॅप्टन सुशांत सिंह संधू हे मूळ भारतीय आहेत. त्याशिवाय जहाजावर २९ भारतीय आणि इतर पाकिस्तानी, फिलिपिनो क्रू मेंबर्स आहेत.