संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 09:41 IST2025-09-29T09:28:40+5:302025-09-29T09:41:41+5:30
ही घटना ऑगस्टमध्ये घडली आहे. पण, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शनिवारी मुलाच्या पालकांना याबाबत माहिती मिळाली.

संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
हरयाणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पानिपतमध्ये एका खाजगी शाळेत सात वर्षांच्या मुलाला क्रूरपणे मारहाण करण्यात आली. त्याला केवळ मारहाणच करण्यात आली नाही तर खिडकीतून उलटे लटकवण्यात आले. ही घटना पानिपतमधील जटाल रोडवरील एका खाजगी शाळेत घडली. कॅब चालकाने केली. दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या सात वर्षांच्या मुलाला मारहाण करून खिडकीतून उलटे लटकवल्याचा आरोप आहे. यादरम्यान, त्याने या घटनेचा व्हिडिओच बनवला नाही तर तो व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्या वर्गमित्रांनाही दाखवला.
ही घटना ऑगस्टमध्ये घडली आहे. पण, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शनिवारी मुलाच्या पालकांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला आणि मॉडेल टाउन पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी कॅब ड्रायव्हर अजयविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये घटनेचा खुलासा
पीडित मुलाच्या आईने सांगितले की, मुलगा यावर्षी विराट नगर येथील सृजन पब्लिक स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. ही घटना १३ ऑगस्ट रोजी घडली. शनिवारी, नातेवाईकांनी व्हायरल व्हिडीओ पाहिला तेव्हा मुलाची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. यामध्ये त्याचे पाय दोरीने बांधलेले होते आणि तो शाळेच्या गणवेशात खिडकीतून लटकत होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याच शाळेचे मुख्याध्यापक इतर विद्यार्थ्यांसमोर आणखी दोन मुलांना थप्पड मारताना दिसत आहेत.
यासाठी केली मारहाण
कुटुंबियांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, व्हिडिओबद्दल काहीही माहिती नाही. पीडितेने त्याच्या आईला सांगितले की अजय काकांनी त्याला खिडकीतून लटकवले होते, आधी त्याला थप्पड मारली होती आणि घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. ही शिक्षा मुलाने गृहपाठ पूर्ण केला नसल्याच्या कारणावरुन केल्याचे मुलाच्या आईने सांगितले.