आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 00:27 IST2025-07-26T00:27:26+5:302025-07-26T00:27:58+5:30
Rahul Gandhi News: नरेंद्र मोदी यांना आपण कधी मोठं आव्हान, मोठी समस्या मानलं नाही, असं विधान राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर आता ते थेट मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये जाणार आहेत.

आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये आयोजित ओबीसी लीडरशिप न्याय महासंमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर थेट हल्ला केला होता. नरेंद्र मोदी यांना आपण कधी मोठं आव्हान मानलं नाही, असं विधान राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर आता ते थेट मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये जाणार आहेत.
राहुल गांधी हे आपल्या एकदिवसीय गुजरात दौऱ्यादरम्यान, आणंद येथे जाणार आहेत. तिथे पक्षाकडून आय़ोजित कार्यक्रमामध्ये ते सहभागी होती. यावेळी ते पक्षाकडून नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना संबोधित करतील. यावेळी राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
गुजरात प्रदेश काँग्रेस समितीने आणंद ये राहुल गांधी यांच्या महत्त्वाकांक्षी अशा संघटना सृजन अभियानांतर्गत नवनियुक्त जिल्हाध्यक्षांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं आहे. हे शिबीर २६, २७ आणि २८ जुलै असे तीन दिवस चालणार आहे. या कार्यक्रमादरम्यान, राहुल गांधी हे गुजरातमधील दूध उत्पादकांची भेट घेणार आहेत.
२०२७ साली होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यात पक्षाची संघटना भक्कम व्हावी. जेणेकरून राज्यात २७ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपासमोर मोठं आव्हान उभं करता येईल, असं राहुल गांधी यांना वाटतं. दरम्यान पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या गृहराज्यामध्ये भाजपाची कोंडी करण्यासाठी सरकारची अव्यवस्था, भ्रष्टाचार, नोकरशाही, कमिशनखोरी आदी मुद्द्यांना अजेंड्यावर ठेवले आहे.
गेल्या काही काळापासून गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचा प्रभाव वाढत आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गुजरात प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अमित चावडा यांची नियुक्ती झाल्यानंतरचा राहुल गांधी यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात राहुल गांधी मोदी आणि भाजपाबाबत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.